सावधान! गडचिरोली जिल्ह्यातील नद्यांना पूर येण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण

अभिजित घोरमारे
Saturday, 22 August 2020

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. सोबत मध्यप्रदेशातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पाण्याचा तीव्र प्रवाह भंडारा जिल्ह्याकडे वाहत आहे.

भंडारा :  सतत सुरू असलेल्या पावसाने गोसेखुर्द धरण तुडुंब भरले आहे. सलग दुसऱ्या दिवशीही या धरणाचे संपूर्ण ३३ दरवाजे उघडले असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहणार आहेत. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. गोसेखुर्द हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. सोबत मध्यप्रदेशातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पाण्याचा तीव्र प्रवाह भंडारा जिल्ह्याकडे वाहत आहे. गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण ३३ दरवाजे दुसऱ्या दिवशीही उघडे असून २५ दरवाजे एक मीटर तर ८ दरवाजे अर्धा मीटर उघडे आहेत.

कालपर्यंत या धरणाचे ३० दरवाजे १ मीटरने तर ३ दरवाजे दीड मीटर उघडे होते. मात्र प्रकल्पात पाण्याची आवक अधिक झाल्याने धरण प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ह्या संपूर्ण ३३ दरवाजांतून ६२७८ क्युमेक्स पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहणार असून दोन्ही जिल्ह्यांतील नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याच्या इशारा देण्यात आला आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून २२ सदस्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दल कालच जिल्ह्यात दाखल झाले आहे.

अधिक माहितीसाठी - कोरडी आत्महत्येच्या निमित्ताने! हे काही आयुष्यावर फुली मारण्याचे वय नव्हते

लाखांदूर-पवनी मार्ग बंद
लाखांदूर-पवनी मार्गावरील आसोला येथे चुलबंद नदीवर असलेल्या पुलावर पुराचे पाणी वाढल्याने या दोन तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे साकोली बोदरा तलाव फुटला त्यामुळे चुलबंद नदीला पूर आला. पुलावर अडीच फुटापर्यंत पुराचे पाणी चढले आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील वाहतूक ठप्प झाली आहे. पुलावरून वाहणाऱ्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे तेथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chance of flooding in Gadchiroli district