Crime News : शेतीच्या वादातून आईचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Crime News : शेतीच्या वादातून आईचा खून

सिंदेवाही (जि. चंद्रपूर) : शेतीच्या वादावरून पोटच्या मुलीसह सुनेने आईचा खून केला. वंदना विनोद खाठे (वय ३५) आणि चंद्रकला प्रभाकर सावसाकडे (वय ४०) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोघींनीही शेतीच्या वादावरून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.

तालुक्यातील मोहाळी (नलेश्वर) येथे तानाबाई महादेव सावसाकडे (वय ६५) या राहत होत्या. ४ ऑक्टोबर रोजी तानाबाई सावसाकडे मृत्युमुखी पडल्याची माहिती मोठ्या मुलीला देण्यात आली. आई मरण पावली म्हणून मृताची मोठी मुलगी रंजना रामेश्वर सोनवणे, तिचे पती बल्लारपूरहून अंत्यविधीसाठी मोहाळीत आले. अंत्यविधीदरम्यान मोठी मुलगी, तिच्या पतीला संशय आला.

अंत्यविधी झाल्यावर मोठ्या मुलीने बुधवारी (ता. ५) सिंदेवाही पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी मृत महिलेची लहान मुलगी, सुनेला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत दोघींनीही तानाबाई सावसाकडे यांच्या तोंडावर व नाकावर चादर दाबून खून केल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी मुलगी वंदना विनोद खाटे आणि सून चंद्रकला प्रभाकर सावसाकडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

हिस्सेवाटणीस नकार दिल्याने काढला काटा

तानाबाई सावसाकडे यांच्याकडे शेत आहे. या शेताचा मुलगी वंदना खाटे व सून चंद्रकला सावसाकडे यांना हिस्सा पाहिजे होता. दोघीही तानाबाई यांना शेताचा हिस्सा मागत होत्या; मात्र तानाबाई हिस्सेवाटणीस नकार देत होत्या. त्यामुळे मुलगी व सून चिडून होत्या. त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी तानाबाई यांचा खून केला. तशी कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली.