
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर झाला. सर्वच प्रकारच्या वाहतुकीवर निर्बंध घातले गेले. त्यामुळे एआरटी केंद्रात नोंद असलेल्या एचआयव्ही एड्स रुग्णांना औषध वितरणाचा गंभीर प्रश्न आरोग्य विभागासमोर उभा ठाकला आहे. त्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात एक कार्य योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेअंतर्गत या लाभार्थ्यांना घरपोच औषधांचे वितरण सुरू झाले. मागील सात महिन्यांपासून जिल्ह्यातील सुमारे चार हजार ८४० रुग्णांसाठी ही योजना वरदान ठरत आहे. जिल्ह्यात आजघडीला सात हजारांवर एचआयव्ही रुग्ण आहेत. मात्र, नियमित उपचार घेणाऱ्यांची संख्या चार हजार ८४० आहे. या रुग्णांची राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयातील एआरटी केंद्रात नोंद आहे.
या सर्व रुग्णांना नियमित औषधोपचार घेणे गरजेचे असते. परंतु, मार्च महिन्यांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन करण्यात आला. वाहतुकीवर बंदी घातली गेली. त्यामुळे या रुग्णांना एआरटी केंद्रात येऊन औषधे घेणे शक्य नव्हते. त्यामुळे या रुग्णांसमोर औषधोपचार घेण्याचा, तर आरोग्य विभागासमोर औषध वितरित करण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात एड्स नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानकंटीवार यांच्या नेतृत्वात एक कार्य योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तालुकानिहाय उपचार घेणाऱ्या रुग्णांची यादी तयार करण्यात आली. सर्व ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयस्तरावर औषधसाठा ठेवण्याचे नियोजन झाले. आईसीटीसी विभागामार्फत औषधाचे प्रत्येक रुग्णांना वितरण करण्याचे ठरले. स्वयंसेवी संस्था, आईसीटीसी विभाग, एआरटी विभागावर वितरणाची जबाबदारी सोपविण्यात आली.
त्यानंतर संकल्प बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था चंद्रपूरद्वारा संचालित लिंक वर्कर प्रकल्पातील लिंक वर्करच्या माध्यमातून औषधी वितरण सुरू झाले. या कामात विहान प्रकल्प, नोबल शिक्षण संस्था, ट्रकर्स प्रकल्प व मायग्रंट प्रकल्प, जनहिताय मंडळ, मायग्रंट प्रकल्प, संबोधन ट्रस्ट कोअर प्रकल्प यांनीदेखील मदत झाली. आतापर्यंत सुमारे पावणेपाच हजारांवर रुग्णांना घरपोच औषधोपचार केला जात आहे.
कोरोनाने देशात हाहाकार माजविला आहे. घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. एचआयव्ही एड्स रुग्ण रुग्णालयातून येऊन औषधी घेणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाने घरपोच औषधी पुरविण्याचे काम हाती घेतले. प्रत्येक महिन्याला आरोग्य विभागाशी निगडित कर्मचाऱ्यांकडून औषध उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे या रुग्णांची वेळ आणि पैसा, अशी दुहेरी बचत झाली आहे. त्यामुळे अनेक रुग्णांनी आरोग्य विभागाचे आभार मानले आहेत.
औषध वितरणाची एक कार्य योजना
देशात लॉकडाउन जाहीर झाले. त्यानंतर रहदारीसाठी वाहने उपलब्ध नव्हती. अशास्थितीत रुग्णांसमोर रुग्णालयातून औषधी घेण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर एक कार्य योजनेच्या माध्यमातून तोडगा काढण्यात आला. मागील सात महिन्यांत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील चार हजार ८४० रुग्णांना घरपोच औषधीचे वितरण करण्यात आले आहे.
- सुमंत पानकंटीवार,
जिल्हा कार्यक्रम अधिकारी, एड्स नियंत्रण कक्ष, चंद्रपूर.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.