व्यायाम करीत असलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला, क्षणात झाले होत्याचे नव्हते

श्रीकांत पेशट्टीवार
Wednesday, 9 September 2020

मागील काही वर्षांत पहाटेच्या सुमारास फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कापसी येथील संस्कार बुरले हा बालक घराशेजारी असलेल्या युवकांसोबत व्यायाम करण्यासाठी पहाटे पाच वाजताच्या सुमारास घराबाहेर पडला.

सावली (चंद्रपूर)  :  जिल्ह्यात वाघांचा वावर वाढल्याने वन्यजीव-मानव संघर्षाच्या घटना उघडकीस येत आहेत. पहाटे आणि रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांची भीती अधिक असते. चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याने मानवावर हल्ला केल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ह्रदय पिळवटून टाकणारी अशीच एक घटना उघडकीस आली. यामुळे समाजमन सुन्न झाले आहे.     

रस्त्याच्या कडेला व्यायाम करीत असलेल्या दहा वर्षीय बालकाला बिबट्याने उचलून नेत ठार केले. ही घटना बुधवारी  तालुक्‍यातील कापसी-व्याहाड बु. मार्गावर सकाळच्या सुमारास घडली. संस्कार सतीश बुरले असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेने गावात दहशतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा - दुर्दैवी! ४ दिवसांपासून शवागारात पडून होता वडिलांचा मृतदेह; पोटच्या पोराने मोबाईल केला बंद.. अखेर...  
 

मागील काही वर्षांत पहाटेच्या सुमारास फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कापसी येथील संस्कार बुरले हा बालक घराशेजारी असलेल्या युवकांसोबत व्यायाम करण्यासाठी पहाटे पाच वाजताच्या सुमारास घराबाहेर पडला. कापसी-व्याहाड बुज या रस्त्यावर युवकांसोबत व्यायाम करीत असताना अचानक बिबट्याने हल्ला करून संस्कारला जंगलात फरफटत नेले.

हा प्रकार सोबतच्या युवकांनी गावात येऊन सांगितला. त्यानंतर गावकऱ्यांनी जंगलाच्या दिशेने धाव घेत शोधकार्य सुरू केले. जंगलात काही अंतरावर बालकाचा पॅन्ट आढळून आला. पुढे काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला.

या घटनेची माहिती वनविभाग आणि पोलिस विभागाला देण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य संतोष तंगडपल्लीवार, सरपंच सचिन तंगडपल्लीवार, वनपरिक्षेत्राधिकारी कामडी, क्षेत्र सहायक बुरांडे, वनरक्षक नागरगोजे, तहसीलदार कामडी, सहायक पोलिस निरीक्षक म्हस्के यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. वनविभागाकडून मृताच्या कुटुंबीयांना तत्काळ २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी कामडी यांनी दिली. 

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten-year-old boy killed by leopard