अरे वाह! चंद्रपूरच्या या बहिणीने थेट पंतप्रधानांना पाठवली ही खास भेट.. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पाळला दिलेला शब्द 

Chandrapur woman send Rakhi made of Bamboo to prime minister
Chandrapur woman send Rakhi made of Bamboo to prime minister

चंद्रपूर : येथील बांबू कारागीर मीनाक्षी मुकेश वाळके यांनी तयार केलेली बांबू शलाका राखी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ११ ऑगस्टला पाठविली आहे. मुनगंटीवारांच्या या पुढाकाराने बांबू कारागिरांमध्ये उत्साह संचारला आहे. या राखीसोबत आमदार मुनगंटीवार यांनी पंतप्रधानांना एक हस्तलिखित पत्र प्रेषित केल्याने या राखी भेटीला भावनिक कंगोरा प्राप्त झाला आहे.

चंद्रपूर येथे माजी अर्थ व वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र स्थापित करण्यात आले आहे. यातून हजारो कुशल बांबू कारागीर निर्माण होऊन रोजगारनिर्मिती झाली. यातील एक बांबू कारागीर मीनाक्षी वाळके यांनी १० ते १२ गरजू आदिवासी व बुरुड समाजाच्या लोकांना रोजगार देत आपली कला सर्वदूर पोहोचविण्यात यश मिळविले.

 लॉकडाउनच्या काळात १० हजार राख्या तयार करून देशभर विक्री केली. इतकेच नव्हे, तर मीनाक्षीने दिल्लीत २०१९ ला पार पडलेल्या अमेरिकेच्या ग्लोबल इनोव्हेटिव्ह एक्‍सचेंज व युनायटेड नेशन समिटच्या सौंदर्य स्पर्धेसाठी बांबू क्राउन तयार केले. जगातील हा पहिला प्रयोग होता. आमदार मुनगंटीवार यांनी मीनाक्षीचे कौतुक केले. त्यावेळी मीनाक्षीने बांबू शलाका राखी पंतप्रधान मोदींना पाठविण्याची इच्छा बोलून दाखविली. एका बांबू कारागिराची भावना लक्षात घेत त्यांनी हस्तलिखित पत्रासह बांबू शलाका राखी पंतप्रधानांना पाठविण्यात येईल याबाबत वाळके यांना आश्‍वस्त केले होते.

त्याअनुषंगाने महापौर राखी कंचर्लावार व मीनाक्षी वाळके यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमदार मुनगंटीवार यांचे हस्तलिखित पत्र व शलाका राखी बंद लिफाफ्यात प्रधान डाकघर येथील प्रवर अधीक्षक ए. एन. सुशीर यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी ही राखी स्पीड पोस्टने २ दिवसांतच पंतप्रधानांना पोहोचती करण्याचे आश्वासन प्रवर अधीक्षक सुशीर यांनी दिल्याने मीनाक्षीचा आनंद गगनात मावेनासा झाला.

भाऊ असावा तर असा

अगदी शेवटच्या दिवशी पायपीट करीत बांबू संशोधन केंद्रात जाऊन प्रवेश घेतला. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे बांबू कारागीर झाली. त्यामुळे आणखी १० गरीब महिलांना रोजगार देता आला. त्यांच्या वाढदिवसाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी पाठविण्याचा संकल्प सांगितला. त्यांनी तो लगेच मान्य केला, नाहीतर माझे कौशल्य अधोरेखित करणारे पत्र पंतप्रधान मोदींना लिहिले आणि ते रवाना झाल्याची पोस्ट पावतीसुद्धा मला मिळाली. खरंच भाऊ असावा तर असा, अशी प्रतिक्रिया मीनाक्षी वाळके यांनी व्यक्त केली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com