मेंढाटोल्याच्या अवैध दारूविक्रेत्याने सुरूच ठेवली दारूविक्री; मग महिलांनी दारू पकडून केली पोलिसांच्या स्वाधिन

भाविकदास करमरकर
Saturday, 24 October 2020

नक्षलग्रस्त आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र येथील अनेक विक्रेते दारूची छुप्या मार्गाने विक्री करीत असल्याचे निर्शनास आले आहे. धानोरा तालुक्यातील मेंढाटोला येथील महिलांनी एका दारूविक्रेत्याची ३५ बॉटल्स देशीदारू पकडून पोलिसांच्या स्वाधिन केली आहे. प्रकरणी पोलिसांनी दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

धानोरा (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील मेंढाटोला येथील गाव संघटनेच्या महिलांनी अहिंसक कृतीच्या माध्यमातून एका मुजोर दारूविक्रेत्याचा मुद्देमाल पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला. चातगाव पोलिसांनी आरोपी रवींद्र अनुरथ मडावी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या मुजोर दारूविक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी गाव संघटनेच्या महिलांनी केली आहे.

मेंढाटोला येथे मागील पंधरा वर्षांपासून दारूविक्री बंद आहे. मात्र, रवींद्र मडावी हा दोन महिन्यांपासून गावात दारूविक्री करीत आहे. दारू विक्री न करण्याची समज देऊनसुद्धा त्याने विक्री सुरूच ठेवली आहे. त्याच्या या अवैध व्यवसायाचा गावाला त्रास होत आहे.

पोलिसांनी केला गुन्हा दाखल

दारूविक्रेत्याला वारंवार सांगूनही तो मुजोरपणे आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवत होता. त्यामुळे गाव संघटनेच्या महिलांनी त्याच्याकडील देशी दारूच्या ३५ बाटल्या पकडून चातगाव पोलिस मदत केंद्रात जमा केल्या. याप्रकरणी दारूविक्रेत्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दारूविक्रेत्याने केली गावकऱ्यांना शिवीगाळ

गाव संघटनेच्या महिला व पोलिस पाटील गावात परतले असता त्या दारूविक्रेत्याने त्यांना शिवीगाळ करीत काठी उगारून मारण्याची धमकी दिली. यापूर्वीसुद्धा त्याच्यावर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या मुजोर दारूविक्रेत्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

जाणून घ्या : अवनी’ येणार मोठ्या पडद्यावर ! विदर्भातील वन्यजीव-मानव संघर्ष प्रथमच रूपेरी पडद्यावर

दारूबंदी टिकविण्यासाठी २५ गावांचे प्रस्ताव

गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक दारूबंदी कायम ठेवण्यासाठी जिल्हाभरातील गावे सरसावली आहेत. दारूबंदीच्या समर्थनात उभे असलेल्या गावांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. यात पुन्हा २५ गावांनी दारूबंदी कायम ठेवण्यासंदर्भातील ठराव घेऊन प्रस्ताव तयार केले आहेत. अशा एकूण ५८१ गावांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठरावाचे पत्र पाठवून दारूबंदी कायम ठेवण्याची मागणी केली आहे.

अवश्य वाचा : गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत ४७ दगावले; पाच हजारांच्या जवळपास बाधित

मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र

जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवण्यासाठी २३ ऑक्‍टोबरपर्यंत ५८१ गावांनी ठराव घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. दारूबंदीच्या समर्थनात उभ्या असलेल्या २५नवीन गावांमध्ये देसाईगंज, एटापल्ली, कोरची, सिरोंचा, कुरखेडा, गडचिरोली, भामरागड तालुक्‍यातील गावांचा समावेश आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Charges filed against Mujor liquor dealer in Mendhatola