पुत्रप्राप्तीसाठी टिल्लू बाबाने उकळले सात लाख रुपये

पुत्रप्राप्तीसाठी टिल्लू बाबाने उकळले सात लाख रुपये
Updated on

नागपूर - दोन लग्न केल्यानंतरही मूलबाळ होत नसल्यामुळे त्रस्त असलेल्या एका महिलेची सात लाख रुपयांनी फसवणूक करणारा टिल्लू बाबा व त्याच्या एका महिला शिष्याविरुद्ध पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. 

मुकेश ऊर्फ बाबा टिल्लू डागोर (६०, रा. रामनगर, पांढराबोडी) आणि रजनी माहुले (३५, रा. बुद्धनगर पार्कजवळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित ३२ वर्षीय महिला शबनम (बदललेले नाव) हिचे पहिले लग्न झाले होते. पहिल्या पतीपासून तिला पुत्रप्राप्ती झाली नाही. त्यासाठी तिने अनेक ठिकाणी वैद्यकीय तपासण्या केल्या. 

शेवटी २०१२ मध्ये पतीचा मृत्यू झाल्यानंतर तिने २०१३ मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीला असलेल्या एका अधिकाऱ्यासोबत लग्न केले. त्या अधिकाऱ्याचीदेखील पहिली पत्नी सोडून गेली होती. या दोघांचे लग्न होऊन दोन वर्षे झाली, तरीही तिला मूलबाळ होत नव्हते. तिची अगतिकता पाहून शेजारी राहणाऱ्या रजनी माहुले (वय ३४) हिने तिला विश्‍वासात घेतले. ‘रामनगर, पांढराबोडी येथे एक बाबा राहत असून तो माझ्या ओळखीचा आहे. त्याचा अनेकदा मी आशीर्वाद घेतला आहे. तो मूलबाळ होण्यासाठी औषधी देतो. त्याचप्रमाणे जादूटोणा करून पुत्रप्राप्ती करून देतो’, असे सांगितले. 

महिलेने ही माहिती आपल्या पतीला दिली. त्यामुळे पूजा करण्यासाठी महिलेचा पती तयार झाला. रजनीने महिलेची मुकेश बाबासोबत भेट करून दिली. मुकेश बाबाने तिला मूल होणार, असे आश्‍वासन दिले होते. त्यासाठी पूजा करावी लागेल आणि खर्चही खूप येईल, असेही सांगितले होते.

दरबार आणि घरात पूजा
मुकेश बाबाने तिला दोन वर्षे खायला औषधे दिली; परंतु तिला काहीच फायदा झाला नाही. दरबारात वारंवार पूजा करूनही मूलबाळ होत नसल्यामुळे टिल्लू बाबाने महिलेच्या घरात पूजा करण्याचे ठरविले. पुत्रप्राप्तीसाठी आसुसलेली महिला पूजेसाठी तयार झाली. टिल्लू बाबाने पूजा करण्यासाठी अनेक रात्री महिलेच्या घरी मुक्‍काम केला. प्रत्येक पूजेच्या वेळी दोघेही महिलेकडून ४० ते ५० हजार उकळत असत. अशा प्रकारे दोघांनीही महिलेकडून सात लाख रुपये उकळले. 

बाबा दाखवत होता भीती
टिल्लू बाबाच्या पूजापाठला महिला कंटाळली होती. औषधे आणि पूजा करूनही पुत्रप्राप्ती न झाल्याने आपली फसगत झाली हे महिलेच्या लक्षात आले. तिने पैसे परत मागितले असता टिल्लू बाबाने तिला भीती दाखविली. त्यामुळे महिलेने पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम २०१३ अन्वये गुन्हा नोंदवून दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडून लिंबू, गंडे, प्लॅस्टिक बाहुली आणि जादूटोण्याचे इतर साहित्य जप्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com