Loksabha 2019 : गडकरी अशक्‍यही शक्‍य करणारे नेते - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

गंगा कधीही शुद्ध होऊ शकत नाही, असे म्हणणारेच आज त्यात अंघोळ करीत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळेच हे शक्‍य झाले. गडकरी अशक्‍यही शक्‍य करणारे नेते असल्याचे गौरवोद्‌गार काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

नागपूर - गंगा कधीही शुद्ध होऊ शकत नाही, असे म्हणणारेच आज त्यात अंघोळ करीत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळेच हे शक्‍य झाले. गडकरी अशक्‍यही शक्‍य करणारे नेते असल्याचे गौरवोद्‌गार काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले. निवडणूक येताच कॉंग्रेसला गरिबांची आठवण येत असल्याची टीकाही त्यांनी केली. 

भाजप-सेना युतीचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी इतवारी शहीद चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार विकास कुंभारे, आमदार गिरीश व्यास, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, माजी महापौर प्रवीण दटके, दयाशंकर तिवारी, सेनेचे मंगेश कढव, बंडू राऊत आदी उपस्थित होते. गडकरी यांच्या पुढाकारामुळे आज शहरात गरिबांसाठीचे 50 हजार घरे पूर्णत्वास आली आहेत. 25 हजार लोकांना मालकी पट्टे देण्यात आले. शहराच्या विकासाची दृष्टी असलेले एकमेव नेते असून, त्यांच्यामुळेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सर्वेक्षणानुसार जगाच्या पहिल्या 10 विकसित शहरात नागपूरचा समावेश झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांनी कॉंगेसवरही तोंडसुख घेतले. 

देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे आश्‍वासन कॉंग्रेसने दिले आहे. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्‍वासने सीमेवरील जवानांच्या आत्मविश्‍वासाचे खच्चीकरण करणारे आहे. मतांसाठी कॉंग्रेस देशालाही विसरली, असा आरोप त्यांनी केला. निवडणूक येताच कॉंग्रेस गरिबी हटावचा नारा देते. 72 हजारांचे आश्‍वासन दिले, परंतु ते कुठून येणार, याचा हिशेब नाही, अशी टीकाही त्यांनी केली. देशातील गरिबी दूर करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. उज्ज्वला योजनेतून महिलांना सिलिंडर, जनधन योजनेतून 80 हजार कोटींची रक्कम गरिबांच्या खात्यात जमा केली. उरी, पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांचा बदला घेणाऱ्या मोदींच्या हाती देश सुरक्षित असून ही निवडणूक विकासाप्रमाणेच देशाच्या अस्मितेची निवडणूक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

भंडाऱ्याचे पार्सल परत पाठवा 
नाना पटोले ज्या पक्षात असतात, तेथे वाद करतात, नंतर ते दुसऱ्या पक्षात जातात. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी भंडाऱ्यातही कामे केली नाही. भंडाऱ्याच्या पार्सलला वेगाने परत पाठवा, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Devendra Fadnavis appealed to elected Nitin Gadkari