मुख्यमंत्री म्हणतात, महात्मा गांधींची ग्रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणू

Chief Minister says bring Mahatma Gandhi concept of village state into reality
Chief Minister says bring Mahatma Gandhi concept of village state into reality

वर्धा  : महात्मा गांधी एक विचार आहे. खेड्‌यांकडे चला या त्यांनी दिलेल्या संदेशाचे आत्मपरीक्षण आवश्‍यक आहे. त्यांची ग्रामराज्य तसेच स्वातंत्र्याची संकल्पना अंमलात आणण्यासाठी आजही गांधीजींचे विचार मार्गदर्शक ठरतात. खेड्यातील माणसाला त्याचे जीवन आनंदाने जगता यावे यासाठी खेड्यांना विकासाच्या मार्गावर नेऊन ती सक्षम आणि स्वावलंबी करणे महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्य आणि विकास खेड्यापर्यंत नेणे म्हणजे सर्वांनी खेड्याकडे जाणे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले.

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती सप्ताहानिमित्ताने सेवाग्राम विकास आराखड्यातील विकासकामांचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ई-लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार रणजित कांबळे, वित्त व नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू, पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, सेवाग्रामच्या सरपंच सुजाता ताकसांडे आदी उपस्थित होते.

महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि विनोबा भावे यांना अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणाले, सेवाग्राम येथील विकासकामांचे लोकार्पण केले आहे. त्यामुळे त्याची जपणूक करण्याची जबाबदारीही आपलीच आहे. स्मारकाच्या जपणुकीसाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिली. चरखागृहात महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची नितांत सुंदर स्क्‍ल्पचर उभे करणाऱ्या जे. जे. स्कूलचा अभिमान असल्याचे ते म्हणाले.

महात्मा गांधी यांच्या स्मृतीला अभिवादन करून ते म्हणाले, सेवाभावी कार्यकर्त्यांनी वास्तूसोबतच गांधीजींची मूल्येही जपली. मूल्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सेवाग्रामच्या कार्यकर्त्यांनी मूल्य जपवणुकीचे केलेले काम आपल्याला करायचे आहे. तत्त्वहीन राजकारण, चारित्र्याशिवाय शिक्षण, कष्टाशिवाय पैसा, नीतिशून्य व्यवहार, त्यागाशिवाय उपासना, मानवतेशिवाय शास्त्र, विवेकरहित आनंद या महात्मा गांधींनी सांगितलेल्या सात सामाजिक पापांची संकल्पनाही त्यांनी यावेळी विशद केली.

पालकमंत्री सुनील केदार यांनी झालेल्या कामांची माहिती यावेळी दिली. कार्यक्रमात महात्मा गांधी यांचे सेवाग्राम येथील वास्तव्य आणि येथून झालेल्या स्वातंत्र्य चळवळीबाबत तसेच सेवाग्राम विकास आराखड्यातील झालेल्या कामांवर आधारीत तयार केलेल्या चित्रफिती उपस्थितांना दाखविण्यात आल्यात. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी उपस्थितांचे आभार मानले तर संचालन ज्योती भगत यांनी केले.
 

निधी कमी पडू देणार नाही : उपमुख्यमंत्री 

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सेवाग्रामच्या भूमीचे पावित्र्य राखण्याचे काम आपलेच आहे. सेवाग्राम आश्रम, पवनार आश्रम आणि धाम नदीच्या सौंदर्यीकरणाचे काम करताना त्याचे पावित्र्य जपले जावे, यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. विकासाची कामे करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी देशी झाडे लावण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

संपादन  : अतुल मांगे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com