बालवैज्ञानिकांचा नवा आविष्कार... वाहनांतील प्रदूषण केले अर्ध्याने कमी

Child Scientist
Child Scientist

पुसद (जि. यवतमाळ) : स्कुटी वा बाईकमधून बाहेर पडणाऱ्या धुरामध्ये कार्बन डायऑक्‍साईड, कार्बन मोनॉक्‍साइड व हायड्रोकार्बन हे घटक हवेतील प्रदूषण घडवून आणतात. पुसद येथील ज्योतिर्गमय स्कूलच्या नववीतील मैथिली व श्रेया तगल्पल्लेवार या बालवैज्ञानिकांनी त्यावर संशोधन केले. त्यांनी सायलेन्सरमध्ये वनस्पतिजन्य घटक वापरून प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यात यश मिळविले. त्यांनी तयार केलेल्या "नॉन पोल्युटिंग व्हेईकल' या प्रकल्पाला जिल्हा विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक प्राप्त झाला. 

प्रदूषण शोषून घेणारा सायलेन्सर

या प्रकल्पात मैथिली प्रवीण तगल्पल्लेवार व श्रेया गजानन तगल्पल्लेवार यांनी धुरातील प्रदूषण शोषून घेणारा सायलेन्सर तयार केला. त्यात त्यांनी नारळाच्या कवटीचे तुकडे, नारळाचा काथ्या, चार्कोल, बांबू व तुळशीची पाने यांचे मिश्रण वापरले. स्कुटी वा बाईकच्या इंजिनमधून बाहेर पडणारा धूर या मिश्रणातून जाताना यातील कार्बन डायऑक्‍साईड, कार्बन मोनॉक्‍साईड व हेक्‍झेन हे वायू शोषले जातात. त्यामुळे या प्रदूषण वायूंचे प्रमाण कमी होऊन प्रदूषणाची पातळी घटविणे शक्‍य होते. यासाठी लागणारे वनस्पतिजन्य घटक स्वस्त व सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे अत्यल्प खर्चात हा प्रकल्प सहजसाध्य आहे. हे सायलेन्सर किमान तीन महिने सक्षमपणे कार्य करू शकेल. त्यानंतर ते परत बदलावे लागेल. या सायलेन्सरच्या वापरामुळे बाईकच्या इंजिनची कार्यक्षमता कमी होणार नसल्याचा दावा या बालवैज्ञानिकांनी केला आहे. 

प्रकल्पाची राज्यस्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

प्रदूषणाचे प्रमाण घटविणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पाची राज्यस्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. उमरखेड येथील महात्मा फुले विद्यालयात जिल्हा विज्ञान प्रदर्शन गुरुवारी (ता.23) व शुक्रवारी (ता.24) झाले. नांदेड येथील जिल्हा प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जयश्री चवणे, शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रदर्शनात माध्यमिक गटातून पुसदचा प्रकल्प अव्वल ठरला. यासाठी शाळेचे विज्ञान शिक्षक सय्यद हाशिम यांचे मार्गदर्शन लाभले. 

बालवैज्ञानिकांचे कौतुक

या बालवैज्ञानिकांच्या यशाबद्दल ज्योतिर्गमय इंग्लिश मीडियम स्कूल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश चिद्दरवार, डॉ. सुप्रिया चिद्दरवार, प्राचार्य राजेश प्रजापती यांनी कौतुक केले. बक्षीस वितरण समारंभात शिक्षणाधिकारी दीपक चवणे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद देशमुख, संस्थाध्यक्ष राम देवसरकर व मान्यवर उपस्थित होते. 


या प्रकल्पात तयार करण्यात आलेले सायलेन्सर लावण्यापूर्वी व नंतरची निरीक्षणे प्रदूषण चाचणीत नोंदविण्यात आले. त्यानुसार कार्बन मोनॉक्‍साईडचे प्रमाण 3.14 वरून 1.26 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले. कार्बन डायऑक्‍साईड 12.7 वरून 8.2 टक्‍क्‍यांपर्यंत घसरले, तर हेक्‍झेनचे प्रमाण 278 वरून 137 एवढे कमी झाले. अर्थात वनस्पतिजन्य सायलेन्सर वापरल्यास प्रदूषणाच्या पातळीत निम्म्यापेक्षा अधिक कपात करणे शक्‍य असल्याचे या प्रयोगातून बालवैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे. यात काही सुधारणा केल्यास हा प्रकल्प पेटंट म्हणून सादर करता येईल. 
- सय्यद हाशिम, मार्गदर्शक शिक्षक, ज्योतिर्गमय स्कूल, पुसद. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com