जन्मदात्यांनी पोटच्या गोळ्यालाच विकले, विकत घेणाऱ्याने मेंढीपालनाला जुंपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

child

जन्मदात्यांनी पोटच्या गोळ्यालाच विकले, विकत घेणाऱ्याने मेंढीपालनाला जुंपले

अमरावती : आर्थिक परिस्थिती योग्य नसल्याने मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) पालकांनी स्वत:च्या अपत्याला वलगाव हद्दीतील एका व्यक्तीकडे सोडून दिले. त्यासाठी त्याच्या आईवडिलांना वर्षाचे ३० हजार रुपये मिळाले होते. ज्या व्यक्तीजवळ चिमुकल्यास सोडले, त्याने त्याला मेंढ्या पालनासाठी राबविल्याची (child labour) धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चाइल्डलाइनने चिमुकल्यास मुक्त करून आईवडिलांच्या स्वाधीन केले. चाइल्डलाइनच्या आपत्कालीन नंबर १०९८ वर वलगाव ठाण्याच्या हद्दीतून कुणीतरी फोन केला. या भागात एक १० वर्षीय बालक पालकांविना भटकत असल्याचे सांगितले. मुलाच्या मदतीसाठी मध्य प्रदेश चाइल्डलाइनकडून मदत मागितली. संरक्षणाच्या दृष्टिकोनातून बालकल्याण समितीला माहिती देण्यात आली. त्यांच्या परवानगीने व वलगाव पोलिसांच्या मदतीने मुलास ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली व बालगृहात दाखल करण्यात आले. चौकशी केली असता मध्य प्रदेशच्या खरगोण जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी असल्याचे त्याने सांगितले. अमरावतीच्या पथकाने चाइल्डलाइन खरगोण येथील समन्वयकाची मदत घेतली.

मुलाच्या घरची आर्थिक स्थिती हलाखीची असून, त्याला मोठी भावंडे आहेत. पालकांनी त्यांची चूक मान्य केली. बालकल्याण समिती अमरावतीने मुलाला त्याच्या घरी पाठविण्यासाठी पोलिसांची मदत घेतली. चाइल्डलाइनचे संचालक नितीन काळे, प्रा. प्रशांत घुलाक्षे, बालकल्याण समिती अध्यक्षा मीना दंडाळे, अंजली घुलक्षे व पोलिसांनी या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली.

चार महिन्यांपासून करायचा मेंढीपालन -

आईवडिलांनी महाराष्ट्रातील एका व्यक्तीकडे मुलाला सोडून दिले व मागील चार महिन्यांपासून ती व्यक्ती मुलाकडून मेंढी चारण्याचे काम करून घेत होती. परंतु, मुलगा पळून आला. त्याच्याकडे ७ हजार २०० रुपये होते. ते पैसे त्याच्या कामाचे असल्याचे त्याने सांगितले.

टॅग्स :Amravati