मुलांच्या डोक्‍यात "पब्जी'चा विषाणू; अनेकांची हरविली झोप 

pubg
pubg

यवतमाळ : सध्या कोरोनाच्या संकटकाळात "पब्जी' या मोबाईल गेमने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. लॉकडाउनच्या काळात मुले तहानभूक विसरून "पब्जी'मुळे आयुष्याचे वाटोळे करून घेत आहेत. खेळाच्या नादात मुलांना रात्रीच्या झोपेचाही विसर पडला आहे. मुलांच्या डोक्‍यात "पब्जी'चा विषाणू शिरल्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. 

संवाद साधण्यासाठी आलेला मोबाईल आता प्रत्येकाच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आईवडील व मुले प्रत्येकाकडे स्वतंत्र मोबाईल आहेत. त्यातच स्मार्टफोनमध्ये 24 तास इंटरनेट सेवा उपलब्ध राहत असल्याने अलीकडे ऑनलाइन खेळांची क्रेझ चांगलीच वाढली आहे. काही वर्षांपूर्वी पोकेमॉन, ब्लू व्हेल अशा खेळाने कित्येकांच्या आयुष्याची रांगोळी केली. त्यात आता "पब्जी'ची भर पडली आहे. पब्जी गेमच्या आहारी गेलेल्या नेर तालुक्‍यातील पिंपरी (मुखत्यारपूर) येथील एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.25) घडली. पब्जी गेममुळे झालेली ही यवतमाळ जिल्ह्यातील पहिलीच आत्महत्या मानली जात आहे.

गुरुवारी घरी कुणी नसताना निखिल पिल्लेवान याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मागील तीन महिन्यांपासून निखिलच्या हाताला कुठलेही काम नसल्यामुळे तो दिवसरात्र मोबाईलवर पब्जी गेम खेळत होता. दररोज तब्बल सोळा-सोळा तास तो मोबाईलवर गेम खेळायचा. या गेमच्या आहारी गेल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांनीही मुलांच्या हातात किती वेळ मोबाईल राहतो, याकडे कानाडोळा चालविला. त्यामुळे मुले तासंतास मोबाईलवर खेळण्यात व्यस्त राहू लागले आहेत.

रात्ररात्रभर न झोपता ऑनलाइन पब्जी गेम खेळणे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी झोपेतून उठणे असा कित्येकांचा दिनक्रम सुरू झाला आहे. मुले खेळाच्या इतके अधीन गेले आहेत की, त्यांना एकप्रकारचे व्यसनच लागले आहे. शिक्षणावर परिणाम होत असून, मुले मानसिकदृष्ट्या कमकुवत बनत आहेत. पब्जीमध्ये आकर्षक व्हिज्युअल्स व ऍक्‍शनचा समावेश आहे. ब्लू व्हेल बनविणाऱ्या कंपनीचाच हा खेळ आहे, असे सांगितले जाते. वेळवेगळ्या थ्रील दृश्‍यांमुळे मुलांची खेळाला पसंती मिळत आहे. त्याचा विपरित परिणाम मानसिकतेवर होत असून, या खेळामुळे चिडचिड, मनात राग निर्माण होतो. पूर्वी शहरी भागातच खेळल्या जाणाऱ्या गेमचा शिरकाव ग्रामीण भागात झाल्याचे दिसून येते. 


विपरित परिणाम 

* मुले अभ्यासापासून दूर जातात 
* ऑनलाइनमुळे डोळ्यांचे आजार 
* हिसंक विचार मनात 
* आई-वडिलांचे ऐकत नाहीत 
* लवकर निराश होतात 

पालकांनी आवश्‍यकता असेल, तरच मुलांना मोबाईल दिला पाहिजे. खेळ हे केवळ करमणुकीचे साधन आहे. आयुष्य नाही. त्यामुळे कोणत्याही खेळाच्या अति आहारी जाऊ नये. पालकांनीही मुलांवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. ऑनलाइन खेळ खेळणाऱ्या मुलांच्या स्वभावात काही बदल जाणवायला लागतात. मुले चिडचिड करतात. जेवण करीत नाहीत. लवकर निराश होतात. एकांतवासात रममाण होतात. असे बदल दिसले की, पालकांनी संवाद साधला पाहिजे. 
- अमोल पुरी, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम शाखा, यवतमाळ.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com