नागपूर जिल्ह्यातील हे आमदारपुत्र उतरणार जि. प. मैदानात?

वीरेंद्रकुमार जोगी
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

सावनेरचे माजी आमदार देवराव आसोले यांचे पुत्र ऍड. गजानन यांनी पारशिवनी तालुक्‍यातील गोंडेगाव सर्कलमधून जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. सर्वसाधारण सर्कल असल्याने येथून लढणारे अनेक असले तरी त्यांनी निवडणुकीसाठी पूर्वीपासूनच तयारी केली आहे. त्यांची उमेदवारी डावल्यास भाजपला येथे मोठा फटका बसू शकतो अशीही चर्चा सर्कलमध्ये रंगू लागली आहे.

नागपूर : जिल्ह्यातील अनेक आमदारांनी त्यांचे राजकीय करिअर जिल्हा परिषदेतून सुरू केले आहे. त्याच्याच पावलावर पाऊल टाकत मुलांनाही राजकीय कारकीर्द उज्ज्वल करायची तयारी करीत आहेत. आजी-माजी आमदारपुत्र-पुत्रीदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

सावनेरचे माजी आमदार देवराव आसोले यांचे पुत्र ऍड. गजानन यांनी पारशिवनी तालुक्‍यातील गोंडेगाव सर्कलमधून जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. सर्वसाधारण सर्कल असल्याने येथून लढणारे अनेक असले तरी त्यांनी निवडणुकीसाठी पूर्वीपासूनच तयारी केली आहे. त्यांची उमेदवारी डावल्यास भाजपला येथे मोठा फटका बसू शकतो अशीही चर्चा सर्कलमध्ये रंगू लागली आहे.

अवश्य वाचा  - आघाडी सरकार काय म्हणते; शेतक-यांना कर्जमाफी नाही म्हणते

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री तसेच काटोलचे आमदार अनिल देशमुख यांचे पुत्र सलील हे देखील जिल्हा परिषद निवडणूक लढविणार आहेत. ते काटोल तालुक्‍यातील येनवा, मेटपांजरा किंवा पारडसिंगा सर्कलमधून लढणार असल्याची चर्चा आहे. या तिन्ही सर्कलमध्ये ते सध्या चाचपणी करीत आहे. येनवा सर्कलमधून ते निवडणूक लढविणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे.

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत हे देखील जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी करीत असल्याची माहिती आहे. त्यांचा सर्कल अद्याप निश्‍चित नसल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांचे पुत्र अनुराग हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.

यांचा मात्र नकार

सावनेरचे आमदार सुनील केदार यांच्या पुत्री डॉ. पौर्णिमा केदार-चिंचमलातपुरे यांची सावनेर तालुक्‍यातील वाकोडी सर्कलमधून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचे सांगून चर्चेला विराम दिला आहे. याशिवाय माजी आमदार सुधीर पारवे यांचे पुत्र रोहित यांनी पुढील दोन वर्षे निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The children of these MLAs are in the electoral arena