esakal | नागरिक 18 तास विजेविना
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नागरिक 18 तास विजेविना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भूमिगत केबल क्षतिग्रस्त झाल्याने गोधनीतील कलेक्‍टर कॉलनी, सरोदे ले-आउट येथील घरांचा वीजपुरवठा सोमवारी रात्रीपासून खंडित झाला. तब्बल 18 तास वीज नसल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोसींचा सामना करावा लागला. अनेक घरांमधील विद्युत उपकरणेसुद्धा निकामी झाल्याने आर्थिक फटकासुद्धा सहन करावा लागला.
रहिवाशांच्या दाव्यानुसार, सोमवारी रात्री आठच्या सुमारास शहरात मुसळधार पाऊस सुरू असताना भूमिगत केबल भ्रष्ट झाली. त्याचवेळी अनेक घरांमधील सॉकेटमधून उजेड निघून विद्युत उपकरणे निकामी झाली. बल्ब, टीव्ही, फ्रीज जळाल्याने नुकसान झाले. प्रारंभी मोठ्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. स्थानिक नागरिकांच्या तक्रारींचा ओघ सुरू झाल्यानंतर महावितरणच्या पथकाने दुरुस्तीकार्य हाती घेतले. काही घरांमधील वीजपुरवठा सुरळीत झाला असला तरी उर्वरित वस्त्या अंधारातच होत्या. यामुळे रात्रीचा स्वयंपाक व जेवणही दिव्याच्या उजेडातच करावा लागला. रात्रसुद्धा जागून काढावी लागली.
वीज नसल्याने विहिरीतील पाणीसुद्धा घेता आले नाही. यामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाण्याचाही ठणठणाट होता. मंगळवारी सकाळी पुन्हा दुरुस्तीकार्य हाती घेण्यात आले. दुपारी दोनपर्यंत वीजपुरवठा पूर्वव्रत होईल, अशी माहिती नागरिकांना कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. प्रत्यक्षात दुपारी तीनपर्यंत वीजपुरवठा खंडितच होता. या प्रकारावर नागरिकांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला. उपकरणे जळाल्याने झालेले नुकसान महावितरणने भरून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महावितरणच्या सूत्रांनीसुद्धा या घटनेला दुजोरा दिला आहे. काही घरांमधील उपकरणे जळाली असली तरी एमसीबी स्वीच आणि गुणवत्तापूर्ण वीज यंत्रणा असलेल्या घरांमधील उपकरणे सुरक्षित असल्याचा दावाही करण्यात आला. नुकसान किती ते मात्र कळू शकले नाही.

loading image
go to top