भयंकर! भुमकाने आठ महिन्याच्या बाळाला दिले गरम सळीचे चटके

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

चिमुकल्यांच्या पालकांनी मात्र उपचार करणाऱ्या भुमकाचे नाव सांगण्यास नकार दिल्याची माहिती आहे. मेळघाटात भुमकाला मानाचे स्थान आहे. आदिवासी त्याला मोठ्या प्रमाणात घाबरत असल्याचे दिसून येते.

चिखलदरा (जि. अमरावती) : अंधश्रद्धेच्या खाईत लोटल्या गेलेल्या मेळघाटात आजही चिमुकल्याच्या शरीरावर कुठल्याही आजारासाठी तप्त सळाखीने चटके दिले जातात. हा अघोरी प्रकार सतत सुरूच असतो. असाच एक प्रकार बोरधा या गावात उघडकीस आला आहे. या संतापजनक प्रकरणात काटकुंभ आरोग्य केंद्राच्या डॉक्‍टरांनी संबंधित मांत्रिकाविरुद्ध (भुमका) पोलिसात तक्रार नोंदविली आहे.

या आठ महिन्यांच्या निरागस बाळाचे आई-बाबा बोरधा येथे राहतात. या बाळला पोटफुगीचा त्रास होता. त्यांच्या आई-वडिलांनी उपकेंद्र किंवा डॉक्‍टरांकडे उपचारासाठी न नेता गावातील मांत्रिकाकडे नेले. तसेच बाळावर अघोरी उपचार करून घेतला. या भूमकाने नेहमीप्रमाणे चुलीत तप्त केलेल्या सळाखीने बाळाच्या शरीरावर चटके दिले. त्यामुळे बाळाचा पोटाचा भाग मानेपर्यंत भाजला आहे.

मुलगा आईच्या भेटीसाठी गावात आला, तिकडे नातीन निघाली पॉझिटिव्ह, नंतर...

हा प्रकार तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना माहित होताच त्यांनी सदर माहिती काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य पाटील यांना दिली. धारणीच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी, तालुका वैद्यकीय अधिकारी सतीश प्रधान यांनी तत्काळ आरोग्य अधिकाऱ्यांना बोरधा गावात पाठविले. त्यांनी बाळाला उपचारासाठी चुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले.

या अघोरी कृत्याबद्दल चिखलदरा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या काटकुंभ पोलिस चौकीत वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. त्या चिमुकल्यांच्या पालकांनी मात्र उपचार करणाऱ्या भुमकाचे नाव सांगण्यास नकार दिल्याची माहिती आहे. मेळघाटात भुमकाला मानाचे स्थान आहे. आदिवासी त्याला मोठ्या प्रमाणात घाबरत असल्याचे दिसून येते.

बघा : ...तर विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य कच्चे राहतील

संबंधितांविरुद्ध कारवाई करा
संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र अंधश्रद्धा अधिनियमाअंतर्गत कारवाई करण्याची मागणी यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारचे प्रकरण उघडकीस आणणारे काटकुंभ येथील कॉंग्रेसचे पीयूष मालवीय यांनी केली आहे.

पालकमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल
21व्या शतकातही मेळघाट अंधश्रद्धेच्या खाईत लोटला गेला आहे. येथे अंधश्रद्धेला मोठ्या प्रमाणात खतपाणी मिळते. आजही येथे चिमुकल्याच्या शरीरावर कुठल्याही आजारासाठी तप्त सळाखीने चटके दिले जातात. मेळघाटात भुमकाला मानाचे स्थान आहे. आदिवासी त्याला मोठ्या प्रमाणात घाबरत असल्याचे दिसून येते. यामुळेच असे प्रकार घडत असतात. आठ महिन्याच्या बाळाला चटके दिल्याचे समजताच पालकमंत्री तथा महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

विदर्भाच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांत केली तक्रार

बोरदा येथील एका आठ महिन्याच्या बाळाला पोटफुगीचा त्रास होता. आई-वडिलांनी बाळाला उपचारासाठी गावातील भूमकाकडे नेले. भूमकाने गरम सळाखीने त्याच्या अंगावर डागण्या दिल्या. त्या बाळाला तत्काळ उपचारार्थ आणण्यात आले असून, पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
डॉ. आदित्य पाटील,
वैद्यकीय अधिकारी, काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Clicks given to an eight month old baby