वातावरणातील बदलाने आंब्यांची गोडी महागणार; आंबे व मोहोर गळून पडले

Climate change will make mango sweets more expensive
Climate change will make mango sweets more expensive

आर्वी (जि. वर्धा) : मोहोरलेल्या आंब्यावर वातावरणातील आकस्मिक झालेल्या बदलाने विपरित परिणाम पडला आहे. झाडावरील आंबे व मोहोर गळून पडत असल्याने सुमारे २५ टक्‍क्‍यांवर उत्पादनात घट होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. परिणामी, आंब्यांची गोडी महागणार असल्याचा अंदाज बाजारात वर्तविली जात आहे.

तालुक्‍यात एकेकाळी मोठमोठ्या गावरान आमराई होत्या. मात्र, काळाच्या ओघात त्या हळूहळू नष्ट होऊ लागल्या. आता क्‍वचितच आंब्याची मोठी झाडे दिमाखात उभी दिसतात. तर दुसरीकडे मोठी झाडे तोडून अनेकांनी कमी उंचीचे व भरघोस पीक देणारे संशोधित झाडाची लागवड करून आंब्यांच्या बागा तयार केल्या आहे. यावर्षी सुरुवातीला पोषक वातावरण असल्याने आंब्याची झाडे चांगलीच मोहरली होती. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. तर माफक दरात भरपूर आंबा खायला मिळणार, रसाची गोडी चाखता येणार या अपेक्षेने नागरिकांच्या तोंडाला पाणी सुटू लागले होते.

मात्र, शुक्रवारपासून वातावरणात अचानक बदल झाला. ढगाळ वातावरण निर्माण झाले. गारांसह पाऊस पडू लागला. वादळवाऱ्यानेसुद्धा कहर केला. झाडांवरील बहरलेली मोहोर व लागलेले आंबे गळून जमिनीवर पडू लागली. पाहता पाहता अर्ध्यापेक्षा जास्त झाडे खाली झाली. तर अशा अवस्थेतसुद्धा झाडांवर टिकून असलेल्या मोहोरवर हवामानाच्या सततच्या बदलाचा दुष्पपरिणाम दिसू लागला. झाडांवरील मोहोरसुद्धा काळपटली. परिणामी आंब्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

वातावरणाच्या या बदलाने शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर विरजण पडले आहे. त्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. पर्यायाने आंब्याच्या दरातसुद्धा वाढ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. माफक दरात आंब्याच्या रसाची गोडी चाखता येईल, या अपेक्षेत असणाऱ्या ग्राहकांनासुद्धा वाढीवदरात आंबे खरेदी करून आपली हौस भागवावी लागणार आहे. या बदलामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार असल्याने त्यांची चिंता वाढली आहे. तर ग्राहकसुद्धा हिरमुसला झाला आहे.

किमतीत होणार वाढ

पूर्वी तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात गावरान आंब्याच्या आमराई होत्या. मात्र, मोठ्या झाडाच्या सावलीमुळे इतर पीक येत नसल्याने शेतकऱ्यांनी आंब्याची झाडे तोडली. आष्टी तालुक्‍यात काही मोजक्‍याच लोकांनी आंब्याच्या बागा लावल्या आहे. याशिवाय अमरावती जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात शहरात गावरान आंबे येतात. मात्र, यावर्षी अचानक वातावरण बदलले आणि मोहोरासह आंबासुद्धा गळू लागला. सुमारे २५ टक्‍केच्या वर उत्पादनात घट होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. परिणामी, दरात मोठी वाढ होण्याची शक्‍यता आहे. असे येथील फळविक्रेते नागोराव लोडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com