क्लिप व्हायरल, विद्यार्थिनीची आत्महत्या!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

महाविद्यालयीन युवतीनेही बदनामीच्या भीतीने आत्महत्या केल्याने मंगरुळपीर शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान शिक्षकासह चौघांना अटक करण्यात आली आहे.

मंगरूळपीर (जि. वाशीम) : हैदराबाद येथील महिला अत्याचाराच्या प्रकरणाची शाई वाळत नाही तोच मंगरूळपीर येथील महाविद्यालयीन युवतीनेही बदनामीच्या भीतीने आत्महत्या केल्याने शहरात एकच खबळब उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. 

चित्रफित व्हायरल करून युवतीच्या आत्महत्येस जबाबदार धरत पोलिसांनी एका शिक्षकासह तिघांना अटक केली असून त्यात एक अल्पवयीन आरोपी आहे. विशेष म्हणजे पालकांच्या तक्रारीनंतर हा संतापजनक प्रकार उघड झाला असून या घटनेने समाजमान हेलावले आहे.

क्लिप व्हायरल
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील एका खेडे गावातील 18 वर्षीय तरुणी मंगरुळपीर येथील एका महाविद्यालयात शिकत होती. 25 नोव्हेंबर रोजी तिच्या वर्गातील मित्राने तिला महाविद्यालयातच एका आडवळणाच्या ठिकाणी बोलावले. त्यानंतर दुसरा आरोपी दीपक वानखेडे याने प्राचार्यांची परवानगी न घेता महाविद्यालय परिसरात प्रवेश करून या युवतीची क्लिप काढली. ती त्याने एका शिक्षकाला पाठविली. शिक्षकाने ती दुसऱ्याला फॉरवर्ड केली. त्याने ती समाजमाध्यमांवर व्हायरल केली. क्लिप व्हायरल झाल्याची माहिती पीडित युवतीला मिळाल्यानंतर आपली व कुटुंबीयांची समाजात बदनामी होईल या भीतीने तिने आत्महत्या केली. ही घटना मंगळवार (ता.3) रोजी पहाटे कुटुंबीयांच्या लक्षात आली. प्रारंभी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रकरण तपासासाठी घेतले होते. मात्र, बुधवारी (ता.4) मुलीच्या पालकांनी फिर्याद दाखल केली. 

शिक्षकांना अटक
त्यानुसार मुलीची महाविद्यालय परिसरातच चित्रफित काढून ती प्रसारित केल्याने तिने बदनामीच्या भीतीने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली. पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या मुलीचा अल्पवयीन वर्गमित्र, चित्रफित काढल्याचा आरोप असेलला दीपक वानखेडे अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, अधिक तपासात शुक्रवारी शिक्षक असलेल्या अरुण चव्हाण व रवी म्हातारमारे यांच्या सहभाग पुढे आला. त्यानंतर या दोघांवरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्याचे समजते.

टवाळखोरांकडे पोलिसांचे दुर्लक्ष
मंगरूळपीर येथे गेल्या अनेक दिवसांपासून टवाळखोरांकडून महाविद्यालयीन युवती व शालेय मुलींना त्रास होत असल्याचे पोलिसांना लेखी व तोंडी तक्रारीद्वारे सूचित केले होते. मात्र, तरीही पोलिसांनी कोणतेही गंभीर पाऊल न उचलल्याने हा प्रकार झाल्याची शहरात चर्चा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Clip viral and girl student suicide