वर्धा जिल्ह्यात बंद, मोर्चांचे सत्र सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात जाऊन महिला व बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पीडितेच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. नयना कडू, रुग्णमित्र गजू कुबडे उपस्थित होते.

वर्धा :  हिंगणघाट येथे प्राध्यापक युवतीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याच्या भयावह घटनेचे जिल्ह्यात पडसाद उमटतच आहेत. गुरुवारी (ता. सहा) विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने हजारो विद्यार्थी व नागरिकांच्या सहभागात मोर्चे काढण्यात आले. वर्धा, देवळी, केळझर, दहेगाव (गोसावी) येथे मोर्चाद्वारे नागरिकांनी आपला उद्वेग व्यक्त केला. यादरम्यान बाजारपेठाही बंद होत्या. मुली-महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने कठोर पावले उचलावी, आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. हिंगणघाट येथील नंदोरी चौकात सोमवारी (ता. तीन) एका प्राध्यापक युवतीला आरोपी विकेश नगराळे (रा. दारोडा, ता. हिंगणघाट) याने पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात पीडित युवती 40 टक्के जळाली असून, तिच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने दारोडा गावात तणावपूर्ण शांतता आहे. दारोडा गावात दररोज मोर्चे काढण्यात येत आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पीडिता व आरोपीच्या दारोडा येथील घरासमोर चोख पोलिस बंदोबस्त कायम आहे. 

हे वाचा— देवाकडे प्रार्थना करा, पुढचे सात दिवस पीडितेसाठी महत्त्वाचे

 राजकीय पक्षांनी बंदचे आवाहन 

वर्धा, देवळी, केळझर, दहेगाव (गोसावी) येथे सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी बंदचे आवाहन केले होते. त्यास व्यावसायिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील मोर्चांमध्ये शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चेकऱ्यांनी विविध रस्त्यांनी मार्गक्रमण करीत मुली-महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आणला. प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. देवळी येथे विद्यार्थिनींनी अतिशय हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त करीत महिलांवरील अन्याय-अत्याचाराला वाचा फोडली. 

मंत्री बच्चू कडू यांच्याकडून सांत्वन 

नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात जाऊन महिला व बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पीडितेच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. नयना कडू, रुग्णमित्र गजू कुबडे उपस्थित होते. आरोपीला कठोर शासन व्हावे, याकरिता मी स्वतः प्रकरणात लक्ष घालीन. त्यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांशी स्वतः चर्चा करेन, अशी हमी त्यांनी दिली. पीडित परिवाराला महिला व बालकल्याण विभागातर्फे जास्तीत जास्त मदत करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसंदर्भात समाजाने अधिक संवेदनाशील होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. 
 

चुलतभावाची उद्विग्नता 

माझ्या बहिणीला भरचौकात आरोपीने पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा अत्याचाराला आपल्या बहिणी पुन्हा बळी पडू नये, यासाठी कायदे कठोर होणे गरजेचे आहे. माझ्या बहिणीला जिवंत जाळणारा आरोपी मला दिसल्यास मी त्याला जिवंत जाळील, अशी उद्विग्नता पीडितेच्या चुलतभावाने वर्धा येथील सभेदरम्यान व्यक्‍त केली. 
 

हे वाचा—वडिलांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेला मुलाचीच साक्ष 

राहूल प्रियांका सेनेचे निवेदन

आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी राहूल प्रियांका सेना महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष अभिजीत फाळके पाटिल यांनी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. कॉंग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी पीडित प्राध्यापिकेच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचे सांगितले आहे. 

 
हिंगणघाट येथील नंदोरी चौकात प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रकार अत्यंत भयंकर आहे. देशात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. हे प्रकार थांबले पाहिजे. या मोर्चात मोठ्या संख्येने मुले आले आहेत. नकार पचवण्याची क्षमता मुलांमध्ये यायला हवी. गृहखाते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. आम्ही महिला सुरक्षेच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करू. मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी गस्त वाढवावी. 
-विद्या चव्हाण,आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Close the Wardha area, continue the morcha