कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण; थंडी पळविली आणि पावसाची शक्यता

नरेंद्र चोरे
Friday, 13 November 2020

विदर्भात जोरदार पावसाची शक्यता नसली, तरी पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची दाट शक्यता आहे. विशेषतः गडचिरोली जिल्ह्यात पाऊस अपेक्षित आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत. ढगांची दाटी कमी झाल्यानंतर पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नागपूर : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे थंडीचा कडाका कमी झाला आहे. ढगाळ वातावरण दोन-तीन दिवस कायम राहण्याची शक्यता असल्यामुळे वैदर्भींची दिवाळी काहीशी गुलाबी थंडीत जाण्याची शक्यता आहे.

विदर्भात अपेक्षेप्रमाणे थंडीचा कडाका वाढू लागला होता. काही दिवसांपूर्वी तापमानात मोठी घट होऊन पारा १२.८ अंशांवर आला होता. हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतातील बहुतांश पहाडी भागांमध्ये बर्फवृष्टीमुळे ही स्थिती निर्माण झाली होती.

सविस्तर वाचा - बाप रे बाप! बाजारात आली २४ कॅरेट अस्सल सोन्याची मिठाई; किंमत ऐकून व्हाल थक्क

तेथील गारठायुक्त वारे विदर्भाच्या दिशेने येत असल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. यामुळे विदर्भातील सर्वच शहरांतील तापमानात मोठी घट झाल्याचे दिसून आले होते. सायंकाळ झाली की हवेत गारवा वाढत होता. पहाटेच्या सुमारास थंडीची तीव्रता अधिक जाणव होती.

मात्र, अचानक तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे कालपासून थंडीचा जोर कमी झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे गेल्या चोवीस तासांत नागपूरच्या किमान तापमानात तब्बल सहा अंशांनी वाढ होऊन पारा १८.३ अंशांवर गेला आहे. इतरही शहरांतील तापमान दोन ते सहा अंशांनी वाढले आहे. कमाल तापमानातही लक्षणीय वाढ दिसून आली आहे.

अधिक माहितीसाठी - लाचखोर स्वीय सहायकाकडे आढळली लाखोंची कॅश; एसीबीची कारवाई

विदर्भात जोरदार पावसाची शक्यता नसली, तरी पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची दाट शक्यता आहे. विशेषतः गडचिरोली जिल्ह्यात पाऊस अपेक्षित आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत. ढगांची दाटी कमी झाल्यानंतर पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कडाक्याच्या थंडीची शक्यता

थंडी वाढत चालल्याने हळूहळू स्वेटर्स, मफलर्स व कानटोपरे बाहेर पडू लागले होते. स्वेटर विक्रेत्यांच्या दुकानांवरही ग्राहकांची गर्दी झाली होती. हवामान विभागाने यंदाही विदर्भात कडाक्याच्या थंडीची शक्यता वर्तविली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cloudy weather in vidarbha