esakal | विदर्भात ईथे आहे मुख्यमंत्र्यांचे आजोळ... 
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thakrey

विदर्भात ईथे आहे मुख्यमंत्र्यांचे आजोळ... 

sakal_logo
By
राज इंगळे

अमरावती : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बालपणाचे काही दिवस परतवाड्यातील म्युनिसिपल हायस्कूल परिसरातील उघडे (किराड) वाड्यात गेले. बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे येथील न्यायालयात बेलीफ म्हणून कार्यरत होते व या काळात ते उघडे यांच्या घरी भाड्याने राहायचे. बाळासाहेबांचे बालपण अनुभवणारा हा वाडा आता मात्र न्यायालयातील वादात अडकला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत विदर्भाच्या विकासाच्या घोषणा करताना माझे आजोळ विदर्भ आहे, असे सभागृहात सांगितले होते. त्यामुळे या वाड्यातील बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. बाळासाहेब बालवयात या वाड्यातील दोन खोल्यांमध्ये राहत होते. मात्र ते कोणत्या साली येथे राहायचे हे सांगणे कठीण आहे, असे आपल्याला आजोबा व वडिलांनी सांगितल्याचे स्व. चंपालाल उघडे यांचे नातू व किराड वाड्याचे मालक विनय उघडे यांनी सांगितले. 

उघडे वाड्याने अनुभवले बाळासाहेबांचे बालपण 
बाळासाहेबांना बालपणी येथे प्रत्यक्ष बघणाऱ्यांपैकी आज कोणीही हयात नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी अधिक माहिती कोणाकडून मिळणे कठीण असल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार संजय राऊत यांच्या खासदार निधीतून म्युनिसिपल हायस्कूल परिसरात मातोश्री रमाबाई ठाकरे स्मृतिभवन बांधण्यात आले होते. आजीच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आलेल्या स्मृतिभवनाचे उद्‌घाटन उद्धव ठाकरे यांनी 19 ऑगस्ट 2009 रोजी केले होते. आजही त्या वास्तूत लोकार्पणाची पाटी दिसते. सध्या तेथे अंगणवाडी भरत असल्याचे उघडे यांच्याकडून सांगण्यात आले. 

हेही वाचा - मी विदर्भाचा नातू, विकासात कसूर करणार नाही..

उद्धव ठाकरेंची वाड्याला भेट 
उद्धव ठाकरे यांनी 2003 मध्ये या वाड्याला भेट दिली होती. तेव्हापासून हा उघडे (किराड) वाडा प्रकाशझोतात आला. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री या वाड्याला कधी परत एकदा भेट देतात, याकडे शहरवासींचे लक्ष लागले आहे. 

जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ट 
प्रबोधनकार ठाकरे व बाळासाहेबांच्या वास्तव्याच्या स्मृती असलेल्या उघडे वाड्यातील खोलीचे बाळासाहेबांच्या नावाचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचा मुद्दा अनेकदा चर्चेचा विषय झाला आहे. ज्या खोलीत बाळासाहेब राहत होते त्या जागेचे मालक विनय रामेश्‍वर उघडे आहेत. सध्या या जागेची किंमत कोट्यवधी रुपये आहे. सोबतच जागेचे प्रकरणही न्यायप्रविष्ट आहे. 

loading image