कर घोटाळ्यास मुख्याधिकारी, अध्यक्ष जबाबदार : भाजप सदस्यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

हिशोब कर निरिक्षकाकडे देवून गोळा झालेली रकम न.पं.च्या लेखपालाकडे स्वाधिन करतो. असा नियम आहे. असे असताना कन्हैय्या करीत असलेली पैशाची अफरातफर मुख्याधिकारी किंवा अन्य अधिकाऱ्यांच्या ध्यानात का आली नाही?

भिवापूर, (जि. नागपूर) : कर वसूल करणारा कर्मचारी कन्हैय्या दुधपचारे याने केलेल्या कराच्या रकमेतील अफरातफरीस नगर पंचायतच्या मुख्याधिकारी व अध्यक्ष जबाबदार असल्याचा आरोप शनिवारी भाजपच्या सदस्यांनी पत्रकारपरिषदेतून केला. यासोबतच तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. 

खरेदी विक्री संघाच्या सभागृहात नगर पंचायतीमधील भाजपच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेतली. कन्हैय्या दुधपचारे याने केलेल्या अफरातफरीच्या रकमेचा आकडा 15 लक्षापर्यंत वाढण्याची शक्‍यता असल्याचे मत भाजप सदस्यांनी नोंदविले. भाजपचे शहराध्यक्ष नगरसेवक आनंद गुप्ता म्हणाले, करवसूल करणारा कर्मचारी दररोज वसुल केलेली रकम व त्याचा हिशोब कर निरिक्षकाकडे देवून गोळा झालेली रकम न.पं.च्या लेखपालाकडे स्वाधिन करतो. असा नियम आहे. असे असताना कन्हैय्या करीत असलेली पैशाची अफरातफर मुख्याधिकारी किंवा अन्य अधिकाऱ्यांच्या ध्यानात का आली नाही? असा प्रश्‍न केला. 

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

नगराध्यक्ष जनतेच्या प्रतिनिधी असून आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणे त्यांचे कर्तव्य आहे. त्यामुळे मुख्याधिकारी दखणे व संबंधित कर्मचारी यांच्या सोबत नगराध्यक्ष किरन नागरिकर यासुद्धा करवसुली घोटाळ्यास जबाबदार असल्याचा आरोप गुप्ता व इतर सदस्यांनी पत्रपरिषदेत केला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला भाजपच्या नगरसेविका वैशाली पेंदाम, नगरसेविका निशा जांभुळे यांच्यासह माजी सरपंच विवेक ठाकरे, जावेद शेख, महादेव नंदनवार उपस्थित होते. 

मुख्याधिकाऱ्यांची मनमानी

नगर पंचायत क्षेत्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकिची आचार संहिता लागू नसताना मुख्याधिकारी दखणे यांनी गत 21 नोव्हेंबरला आयोजित न.पं.ची सर्वसाधारण सभा आचार संहितेचे कारण पुढे करू न रद्द केली. करवसुलीच्या रकम घोटाळ्याच्या चौकशी अहवालाची प्रत मागितली असता ती पण आचार संहितेचे कारण सांगून मुख्याधिकाऱ्यांनी देण्यास नकार दिल्याचा आरोप यावेळी भाजपच्या सदस्यांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CO responsible for Bhiwapur tax scam