esakal | आचारसंहितेचा धसका
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

आचारसंहितेचा धसका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : पुढील महिन्यात आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्‍यता असल्याने विकासकामांच्या भूमिपूजनाचा व कामांचा आढावा घेण्याचा धडाका सुरू झाला आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी ही कामे मार्गी लावून ती जनतेसमोर मांडायची असल्याने लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला अक्षरशः सळो की पळो करून सोडले आहे. पीएमअेवायच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम हा त्यातीलच एक भाग आहे.
विधानसभेच्या निवडणुका ऑक्‍टोबरमध्ये होत आहेत. पुढील महिन्यात सप्टेंबरच्या दुसऱ्या सप्ताहात आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता आहे. गणेशोत्सवानंतर आचारसंहिता लागू करण्यात येईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. ती लागण्यासाठी आता उणेपुरे 23 दिवस उरले आहेत. त्यापूर्वी मतदारसंघातील विकासकामांचा व विविध योजनांचा आढावा घेण्याचा सपाटा लोकप्रतिनिधींनी सुरू केला आहे. अनेक कामांच्या भूमिपूजनास गती आली आहे. सुरू असलेल्या कामांची गती वाढविण्याचे निर्देश व सूचना लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाला दिल्या जात आहेत. दररोज कोणत्या न कोणत्या विभागात आढावा बैठकी सुरू आहेत.
पालकमंत्र्यांनी यासाठी विशेष आग्रह धरला आहे. यानंतर रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांनाही प्रमाणपत्र देण्याची योजना आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील काही लाभार्थ्यांना ताबा प्रमाणपत्र आधीच देण्यात आले आहे.
आचारसंहितेचा धसका आताच लोकप्रतिनिधींनी घेतला असून शिल्लक असलेल्या मुदतीत अधिक कामे मार्गी लावण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. या धावपळीत प्रशासनाला मात्र त्यांनी सळो की पळो करून सोडले आहे, हे खरे.

loading image
go to top