आली, आली...ती पुन्हा आली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

  • गेल्या आठवड्यात पळालेली थंडी परतली
  • 17 अंशापार गेलेला पारा 13.6 अंशावर घसरला
  • आर्द्रता 20 ते 25 टक्क्यांनी घटली
  • थंडीची लाट येण्याची शक्यता

अकोला : गत आठवड्यात अचानक हवामानात बदल होऊन पळालेली थंडी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ...पुन्हा येईन, ...पुन्हा येईन, असे भाकीत हवामान तज्ज्ञांनी केले होते. ...आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ती पुन्हा आली. दोन दिवसात किमान तापमानाचा पारा 17 अंशावरून थेट 13 अंशावर घसरला आणि बोचऱ्या थंडीने अकोलेकरांना हुडहुडी भरवली.

यंदा जुलैल्या दुसऱ्या आठवड्यात मॉन्सूनचे आगमन झाले आणि आॅक्टोबर अखेरपर्यंत पावसाने अकोलेकरांसह वैदर्भियांना झोडपून काढले. जमिनीत पावसाचा वाफसा व्हायला मोठा कालावधी लागला आणि वातावरणातील आर्द्रतेचा टक्काही अधिक राहल्याने, दसरा, कोजागिरी पौणिर्मेला अनुभवाला येणारी थंडी अजूनपर्यंत अनुभवता येऊ शकली नव्हती. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात किमान तापमानाचा पारा 14 अंशापर्यंत घसरून हिवाळ्याची सुरुवात झाल्याचा अनुभव अकोलेकरांनी घेतला. परंतु, चवथ्या आठवड्यात केरळ, कर्नाटक भागात अचानक दोन वादळांची निर्मिती होऊन, या भागासह महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले. आर्द्रतेचा टक्का वाढून गर्मी वाढली आणि जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा 14 वरून 17 अंशापार गेला. परंतु, जम्मू-कश्मिरमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम लवकरच या गर्मीला पळवून, जिल्ह्यासह विदर्भात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात थंडीची लाट आणेल, असे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले होते. त्यांचे भाकित खरे ठरले असून, दोन दिवसांपासून किमान तापमानात चार ते पाच अंशाने घसरण झाली असून, सरासरी आर्द्रतेचा टक्का 85 वरून 60 वर आला आहे.

लवकरच पारा 10 अंशाखाली जाणार
केरळ, कर्नाटक भागात अचानक निर्माण झालेल्या वादळामुळे आर्द्रता, उष्णता, गर्मी वाढली होती. आता मात्र आर्द्रता कमी झाली असून, किमान तसेच कमान तापमान घसरले आहे. जम्मू काश्मिर भागात बर्फवृष्टी सुरू असल्याने, पुढील तीन ते चार दिवसात विदर्भासह राज्यातील तापमानात अजून घसरण होऊन किमान तापमान 10 अंशाखाली जाण्याची शक्यता आहे.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर 

हरभरा, गव्हाला लाभ
रब्बीतील मुख्य पीक हरभरा आणि गव्हाची पेरणी बहुतांश भागात सध्या झाली असून, कडाक्याची थंडी आणि दव या पिकांसाठी पोषक मानले जाते. त्यामुळे वाढत असलेली थंडी या पिकांना लाभाची ठरत असून, हवामान तज्ज्ञांच्या मते आर्द्रतेचा टक्का कमी झाल्याने, दवं पडण्याचे प्रमाणही काही अंशी वाढणार असून, ती सुद्धा रब्बीसाठी फायद्याचे ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cold returned again

फोटो गॅलरी