
थंडीच्या लाटेने नागपूरसह अख्ख्या विदर्भालाच कवेत घेतले आहे. मागील काही दिवसांपासून नागपूरचा पारा खाली आलेला आहे. शहरात दिवसभर बोचरे वारे व गारठा जाणवला. थंडीचा सर्वाधिक फटका लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना बसतो आहे.
नागपूर : उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे विदर्भात गारठा वाढला आहे. नागपूरसह अनेक जिल्ह्यांतील पाऱ्यात मोठी घसरण झाली आहे. नागपुरात निचांकी तापमानाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली.
हिमाचल, उत्तराखंडसह उत्तर भारतातील पहाडी भागांत सुरू असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे सध्या मध्यप्रदेश व विदर्भात थंडीची तीव्र लाट पसरली आहे. त्यामुळे विदर्भातील बहुतेक शहरांमध्ये पारा दोन ते पाच अंशांनी घसरला आहे. रविवारी १४.१ अंशांवर गेलेला पारा चोविस तासांत पाच अंशांनी घसरून ९.४ अंशांवर आला.
अधिक माहितीसाठी - सावधान! मुली पळवणारी टोळी सक्रिय; पारशिवनी तालुक्यात घडताहेत एकापाठोपाठ घटना
सोमवारी विदर्भात सर्वाधिक थंड रात्र नागपुरात नोंदविण्यात आली. याशिवाय ब्रम्हपुरी (१०.३ अंश सेल्सिअस), गोंदिया (१०.५ अंश सेल्सिअस) अकोला (१०.८ अंश सेल्सिअस) आणि वर्धा (१०.९ अंश सेल्सिअस) येथेही थंडीचा कडाका जाणवला. विदर्भात थंडीची लाट आणखी दोन-तीन दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
थंडीच्या लाटेने नागपूरसह अख्ख्या विदर्भालाच कवेत घेतले आहे. मागील काही दिवसांपासून नागपूरचा पारा खाली आलेला आहे. शहरात दिवसभर बोचरे वारे व गारठा जाणवला. थंडीचा सर्वाधिक फटका लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना बसतो आहे. प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात थंडीची लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
दिवसभर गार वारे अंगाला झोंबतात. सायंकाळ होताच गारठा आणखी वाढतो. हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता सध्यातरी वैदर्भींची थंडीपासून सुटका होण्याची शक्यता कमीच आहे. विदर्भात उशिरा का होईना थंडीची तीव्र लाट आली. पाऱ्यात दिवसेंदिवस घसरण होत आहे. हवेतील गारठ्यामुळे दिवसभर हुडहुडी जाणवते. सायंकाळ होताच गारठा वाढू लागतो.