esakal | महाविद्यालये सध्या सुरू होणार नाहीत, उदय सामंतांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

उदय सामंत

महाविद्यालये सध्या सुरू होणार नाहीत, उदय सामंतांची माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात येणार आहेत. तसेच शासनाच्या निर्णयानुसार महाविद्यालयेसुद्धा तूर्तास सुरू न करण्याची सरकारची भूमिका आहे, ती कायम राहील. विद्यापीठातील अनेक रिक्त पदे भरण्यासाठी वित्त विभागाची परवानगी आवश्यक आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (minister uday samant) म्हणाले. (colleges not open yet says minister uday samant)

हेही वाचा: नाना पटोले, नितीन राऊत यांचा वाद पोहोचला दिल्ली दरबारी

शासकीय बैठकीनिमित्त शनिवारी (ता.10) ते अमरावतीत आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. उदय सामंत म्हणाले की, उच्च महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याबाबतच्या परवानगीबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठांमधील शेकडो पदे रिक्त असली तरी नियमानुसार तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची तसेच कंत्राटी तत्त्वार कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकार विद्यापीठांना देण्यात आले आहेत, त्याचा अधिकार त्यांनी वापरला पाहिजे. विशेष म्हणजे विद्यापीठ परीक्षांमध्ये होणाऱ्या गोंधळाला आळा घालण्यासाठी पुढील काळात परीक्षा तसेच गोपनीय विभागामध्ये कंत्राटी लोकांना नियुक्ती करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

फार्मसी, पॉलिटेक्निकच्या अपग्रेडेशनला प्राथमिकता -

कोरोना काळापासून फार्मसीसारख्या अभ्यासक्रमांना अधिक प्रतिसाद मिळत असून यापुढील काळात फार्मसी तसेच पॉलिटेक्निक कॉलेजेसच्या अपग्रेडेशनला प्राधान्य देण्यात येणार आहे. या महाविद्यालयांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यास निधीबाबतचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना संबंधित महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.

व्हीएमव्हीला मिळणार कोटींचा निधी -

केवळ अमरावती जिल्हाच नव्हे तर संपूर्ण विदर्भात परिचित शासकीय ज्ञान विदर्भ संस्था अर्थात व्हीएमव्ही कॉलेजच्या स्थापनेला 2022-23 मध्ये 100 वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त महाविद्यालयातील आवश्यक बाबींसाठी शासनाकडून 10 कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. याशिवाय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये केमिकल इंजिनिअरिंग हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

loading image