मनपा कार्यालय परिसरात थुंकले; आयुक्त संतापले, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

नागपूर : शहरात स्वच्छतेसाठी महापालिका उपद्रव शोधपथक परिश्रम घेत आहे. मात्र, महापालिका आवारातच कर्मचाऱ्यांकडूनच घाण केली जात असल्याने आयुक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी महापालिकेच्या 12 कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस बजावून निलंबित का करू नये, अशी विचारणा केली.

नागपूर : शहरात स्वच्छतेसाठी महापालिका उपद्रव शोधपथक परिश्रम घेत आहे. मात्र, महापालिका आवारातच कर्मचाऱ्यांकडूनच घाण केली जात असल्याने आयुक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी महापालिकेच्या 12 कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस बजावून निलंबित का करू नये, अशी विचारणा केली.
शहरात स्वच्छता राहावी, सार्वजनिक ठिकाणी घाण होऊ नये यासाठी मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे विविध भागांमध्ये देखरेख ठेवली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी घाण करून शहर विद्रूप करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. केवळ शहरातच नव्हे तर सिव्हिल लाइन्स येथील मनपा मुख्यालय परिसरातही मनपाच्या उपद्रव शोध पथकाने थुंकणाऱ्यांवर कारवाई केली. मनपाच्या सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी वाहन चालक शेखर शंखदरबार, शिक्षण विभागातील सहायक अधीक्षक अनिल कराडे, स्थानिक संस्था कर विभागाचे समिती विभागात कार्यरत मोहरीर भूपेंद्र तिवारी, आरोग्य विभागाचे मागासवर्ग कक्षात कार्यरत सफाई मजदूर अविनाश बन्सोड, आरोग्य विभागातील जमादार स्वप्नील मोटघरे, एसआरए विभागातील चपराशी भगवानदिन पटेल, स्थानिक संस्था कर विभागाचे पीबीएक्‍स येथे कार्यरत मोहरीर विकास गावंडे, कर व कर आकारणी विभागातील कर संग्राहक सुनील मोहोड, कर व कर आकारणी विभागातील वित्त विभागात कार्यरत ज्येष्ठ श्रेणी लिपीक प्रमोद कोल्हे, अग्निशमन विभागातील रवींद्र सतभैया, सामान्य प्रशासन विभागातील मजदूर शैलेश ढगे, कर व कर आकारणी विभागातील कनिष्ठ निरीक्षक प्रमोद मोगरे या 12 कर्मचाऱ्यांना आयुक्त अभिजित बांगर यांनी नोटीस बजावली. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांतही खळबळ माजली आहे. खर्रा, पानांची भिंतीवर पिचकारी मारणाऱ्यांनी कारवाईचा धसका घेतला आहे.
महिनाभरात 105 जणांवर दंड
11 सप्टेंबर ते नऊ ऑक्‍टोबरपर्यंत मनपा मुख्यालयात 105 नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व उघड्यावर लघवी करण्यासाठी दंड ठोठावण्यात आला. त्यांच्याकडून एकूण 12 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. या 105 जणांमध्ये मनपाच्या विविध विभागात कार्यरत 12 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: commissioner, corporation