esakal | संचारबंदी व पोलिसांचा खडा पहारा तरी होतेय गोवंशाची कत्तल!
sakal

बोलून बातमी शोधा

balapur govansh 1.jpg

संचारबंदी लागू असताना कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. दरम्यान, बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे व पोलिस कर्मचारी पारस येथे जात होते. त्यावेळी त्यांना बाळापूर येथील महेश नदीच्या पुलाजवळ आरोपी या तीन गोवंशाना कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने घेऊन जाताना आढळून आले.

संचारबंदी व पोलिसांचा खडा पहारा तरी होतेय गोवंशाची कत्तल!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाळापूर (जि. अकोला) : कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणाऱ्या तीन गोवंशाना बाळापूर पोलिसांनी बुधवारी (ता.8) सकाळी केलेल्या कारवाईत जीवनदान देत दोन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. संचारबंदी लागू आहे. सगळीकडे पोलिस प्रशासनाचा खडा पहरा आहे. राज्यात कोरोनाची पार्श्‍वभूमी आहे. असे असतानाही परिसरात गोवंशाची कत्तल होत असल्याचा प्रश्‍न या घटनेच्या अनुषंगाने निर्माण झाला आहे.

हेही वाचा- अकोला येथे आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह, दुसरा अकोट फैलातील

महेश नदीच्या पुलाजवळ केली कारवाई
संचारबंदी लागू असताना कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. दरम्यान, बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे व पोलिस कर्मचारी पारस येथे जात होते. त्यावेळी त्यांना बाळापूर येथील महेश नदीच्या पुलाजवळ आरोपी या तीन गोवंशाना कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने घेऊन जाताना आढळून आले. याची पोलिसांकडून तत्काळ दखल घेत त्यांना अडवून चौकशी केली. दरम्यान, आरोपी जुबेर अहमद अब्दुल निसार व शाहरुख अहमद शेख कालू रा.कासारखेड (बाळापूर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून अंदाजे तीस हजार रुपये किमतीचे गोवंश ताब्यात घेत पोलिसांनी तीन गोवंशांना जीवदान देत कर्तव्यतत्परता दाखविली.

दारु अड्यावर धाड; तीस हजरांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी दोन वेगवेगळ्या घटनेत केलेल्या कारवाईत 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर याच घटनेतील एक जण फरार झाला आहे. मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळी अकरा वाजता दोन वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व भागात कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश लागू केले आहेत. मात्र, या काळातही अवैध गावठी व देशी दारूची विक्री सुरू आहे. या दारू अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी रात्री धाड टाकून 1 हजार 800 रुपयांची गावठी दारू व नगदी 450 रुपये पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई तामशी येथील नदीच्या काठावर करण्यात आली असून, या प्रकरणी विलास इंगळे, मनोहर मेसरे व उपसरपंचांचे पती राजेश मेसरे या तिघांवर गुन्हा दाखल केला असून, यापैकी तामशी येथील उपसरपंचपती हा फरार झाला आहे.