भाजप कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी काँग्रेस उमेदवारावर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

अकोट (अकोला) : लोकसभा निवडणुकीच्या पराभवामुळे भाजपा कार्यकर्त्याची हत्या केल्याप्रकरणात मारहाण करणाऱ्यासोबत लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार हिदायत पटेल हे सुद्धा होते, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मोहाळा येथे एसआरपीएफची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहे. 

अकोट (अकोला) : लोकसभा निवडणुकीच्या पराभवामुळे भाजपा कार्यकर्त्याची हत्या केल्याप्रकरणात मारहाण करणाऱ्यासोबत लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार हिदायत पटेल हे सुद्धा होते, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मोहाळा येथे एसआरपीएफची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहे. 

तालुक्यातील मोहाळ्यात राजकीय वैमनस्यातून शुक्रवारी सायंकाळी भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या कार्यकर्त्यावर लाठ्या-काठ्या आणि पाईपने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याने त्याला अकोला येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मतीन पटेल असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

मृतकाचे नातेवाईक इनायतखा मियाखा पटेल यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला याबाबत दिलेल्यात फिर्यादीत नमूद केले आहे की, अकोट तालुक्यातील मोहाळा हे लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार हिदायत पटेल यांचे गाव आहे. मृतक मतीनखा पटेल हे भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे काम केले. निकाल जाहीर झाल्यावर शुक्रवारी (ता. 24) सायंकाळी साडेसातच्या सुमारास काही जण हे मतीनखा पटेल यांच्या घरासमोर जोरात शिवीगाळ करीत असल्याने मुमताजखा व मतीनखा पटेल हे घराबाहेर आले. शिवीगाळ का करता असे म्हणताच त्यांनी मुमताजखा व मतीनखा यांच्यावर लाठ्या-काठ्या, लोखंडी पाईपने हल्ला चढवला. त्यामुळे जखमी झालेल्या मतीन व मुमताज पटेल यांना तत्काळ अकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मतीन पटेल यांना मृत घोषित केले. 

या प्रकरणी मारहाण करणाऱ्याच्या सोबत लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार हिदायत पटेल हे सुद्धा होते, अशा फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यासंदर्भात हिदायत पटेल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: complaint filed against congress candidate for murder