इथे मृतदेहसुध्दा देतात जळण्यास नकार; स्मशानभूमीत गेल्या चार वर्षात एकही अंत्यसंस्कार नाही

दशरथ जाधव
Thursday, 3 December 2020

शहराच्या एका बाजूला रोटरी क्‍लबने सुंदर अशी स्मशान भूमी निर्माण केली तर दुसऱ्या बाजूलासुद्धा तशीच सुंदर स्मशानभूमी व्हावी ही इच्छा आमदार दादाराव केचे यांची होती.

आर्वी (जि.वर्धा) : खासदार फंडातील सात लाख रुपयाचा निधी खर्च करून संजयनगर लगत आधुनिक स्मशान घाट निर्माण केले. थाटात याचे उद्‌घाटनसुद्धा झाले. मान्यवरांची पाठ फिरताच नगर परिषदेने याला कचरा डेपोत रूपांतर केले. कचऱ्याचे ढीग साचले. घाणीचे सम्राज्य पसरले. यामुळे मृतदेह सुद्धा जळण्यास नकार देवू लागले. उद्‌घाटन झाल्यापासून आजपर्यंत येथे एकावरही अंत्यसंस्कार करण्यात आला नाही.

शहराच्या एका बाजूला रोटरी क्‍लबने सुंदर अशी स्मशान भूमी निर्माण केली तर दुसऱ्या बाजूलासुद्धा तशीच सुंदर स्मशानभूमी व्हावी ही इच्छा आमदार दादाराव केचे यांची होती. याकरिता त्यांनी नगर परिषदेला खासदार रामदास तडस यांच्याकडून सात लाख रुपयाचा निधी प्राप्त करून दिला. नगर परिषदेने याकरिता सारंगपुरी मौज्यातील संजय नगर लगतची चार हजार चौरसफुट जागा उपलब्ध करून दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाने सुंदर अशी स्मशानभूमी निर्माण केली.

क्लिक करा - आई म्हणून जन्मदात्रीने आपले कर्तव्य पार पाडले; मात्र, मुलांनी सोडले वाऱ्यावर! 

20 ऑक्‍टोंबर 2016 ला खासदार रामदास तडस, आमदार दादाराव केचे, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांनी त्याचे केले. मात्र उद्‌घाटन होताच नगर परिषदेला स्मशान घाटाचा विसर पडला. आरोग्य विभागाने त्याचे कचरा डेपोमध्ये रुपांतर केले. कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले. घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. माणुसच काय मृतदेह सुद्धा तिथे जाण्यास धजावणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी उद्‌घाटनापासून आता पर्यंत या स्मशान घाटावर एकही अंत्यसंस्कार झाला नाही. खासदार रामदास तडस यांनी नागरिकांना सुविधा निर्माण व्हावी याकरिता सात लाखाचा निधी दिला मात्र नगर परिषदेने आपल्या दुष्कृर्त्याने यावर पाणी फेरले.

आर्थिक हित साधण्याचा उद्देश

नगर परिषदेने कचरा संकलनाचा कंत्राट दिला होता. काम सुरू होते, मात्र पदाधिकारी व प्रशासनाचे आर्थिक हित साधल्या जात नव्हते. परिणामी कंत्राट रद्द केला आणि मनुष्यबळाच्या माध्यमातून काम सुरू केले. यात पदाधिकारी व प्रशासनाचे हित संबंध जुळले असल्याने यातून कमाई सुरू झाली. कमी अंतरावर असलेल्या स्मशानघाटात कचरा पडू लागला तर दुसरीकडे अनेकांची झोळी भरू लागली. आता पुन्हा जेसीबी लाऊन तो कचरा साफ होईल यात नगर परिषदेला आर्थिक फटका बसेल आणि पदाधिकारी व प्रशासनाचे आर्थिक हित साधल्या जाईल असे समाजसेवक गौरव जाजू यांनी सांगितले

आरोग्य विभागाकडून माहिती घेऊन स्मशान घाट परिसरातील कचरा ढिगारे हटवून परिसर स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहे. यापुढे तेथे कचरा टाकण्यात येऊ नये असे सक्तीचे आदेश दिले आहेत.
- प्रशांत सव्वालाखे
नगराध्यक्ष, आर्वी

सविस्तर वाचा - ‘डिअर मम्मी-पप्पा, तुम्ही वेळ देत नाही आम्ही घर सोडतोय’; दोघ्या बहिणींचे इंस्टाग्राम प्रेम 

स्मशानभूमी परिसरात कचरा टाकल्याची माहिती मला मिळताच आरोग्य निरीक्षकाला याची पाहणी करून तत्काळ ढिगारे हटविण्याचे आदेश दिले आहे. दोन दिवसात संपूर्ण परिसर स्वच्छ होईल.
विद्याधर अंधारे,
मुख्याधिकारी, नगर परिषद आर्वी 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: condition of crematorium is too bad in wardha district