रस्ता झाला उंच, दुकाने आली खाली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

गेल्या वर्षभरापासून तिरोडा-तुमसर-रामटेक-मनसर या नवीन सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. हा रस्ता पूर्वीच्या डांबरी रस्त्यापेक्षा दोन ते तीन फूट उंच बनविला जात आहे.

रामटेक, (जि. नागपूर) : मनसर-तिरोडा मार्गावर सिमेंट रस्त्याचे बांधकाम हे पूर्वीच्या डांबरी रस्त्यापेक्षा दोन फूट उंच केले जात आहे. त्यामुळे या रस्त्यामुळे जीवन विस्कळीत होऊन व्यवसाय-धंद्यांवर विपरीत परिणाम होतो आहे. हा रस्ता पूर्वीच्या डांबरी रस्त्याच्या पातळीतच व्हावा या मागणीसाठी कॉंग्रेसचे नेते उदयसिंग (गज्जू) यादव यांनी शीतलवाडी येथे आंदोलन केले. 

गेल्या वर्षभरापासून तिरोडा-तुमसर-रामटेक-मनसर या नवीन सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. हा रस्ता पूर्वीच्या डांबरी रस्त्यापेक्षा दोन ते तीन फूट उंच बनविला जात आहे. या उंच रस्त्यामुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक मार्ग विस्कळीत होतील व येथील परिस्थिती बिघडून जाईल. त्याचा त्रास रस्त्याच्या बाजूला घरे असणाऱ्यांना होईल. तसेच याचा परिणाम त्या-त्या भागातील उद्योगधंदे व व्यवसायावर होण्याची शक्‍यता आहेच. 

स्त्याचे कामही बंद पाडले

खिंडसीपासून रामटेक, शीतलवाडी, वाहिटोला, मनसर या गावांतून जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट बांधकाम पूर्वीच्या डांबरी रस्त्याच्या समपातळीतच करावे या मागणीसाठी नागरिकांनी 8 नोव्हेंबर 2019 रोजी नायब तहसीलदार मनोज वाडे, पोलिस कर्मचारी व वारविक कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक मिश्रा यांच्यासोबत चर्चा झाली. यावेळी संतप्त नागरिकांनी रस्त्याचे कामही बंद पाडले होते. आता पुन्हा रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी 1 वाजेपासून शीतलवाडी टी-पॉइंट येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. कॉंग्रेसचे जिल्हा महासचिव उदयसिंग (गज्जू) यादव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जात आहे. 

हायमास्ट लाइट लावण्यात यावे

यासोबतच शिवनी (भोंडकी), महादुला, भंडारबोडी, घोटीटोक, बोरी, शीतलवाडी, वाहिटोला, मनसर येथील बसथांब्याजवळ महिलांसाठी स्वच्छतागृह बांधावे अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली. या सर्व ठिकाणी व रामटेक-किटस कॉलेज बायपासजवळ मुरमुरा भट्टीजवळ हायमास्ट लाइट लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. त्यासाठी अतिरिक्त निधीची मागणी करावी, असेही नोंदविण्यात आले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress agitates in Ramtek for road