विजयाने कॉंग्रेसमध्ये चैतन्य परतले

विजयाने कॉंग्रेसमध्ये चैतन्य परतले

नागपूर : शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, माजी मंत्री नितीन राऊत यांच्या विजयामुळे शहरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमधील मगरळ दूर होऊन चांगलेच चैतन्य निर्माण झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत दोघांनाही गटबाजीचा फटका बसल्याचे आकेडवारीवरून तरी दिसून येत नाही. विशेष म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमुळे कट्टर विरोधक असलेल्या नेत्यांनी आपसातील मतभेद विसरुन एकामेकांना सांभाळून घेतल्याचे कळते. 
कॉंग्रेसला कॉंग्रेसच पाडू शकते अशी म्हण चांगलीच रूढ झाली आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत याची सर्वांनाच प्रचीती आली. अवघे 18 नगरसेवक निवडून आले होते. खुद्द शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनाही गटबाजीने पराभावाचा फटका बसला होता. लोकसभेच्या निवडणुकीतही गटबाजी उघडपणे दिसत होती. त्यामुळे विधानसभेत कॉंग्रेसचे काही खरे नाही असेच बोलल्या जात होते. सातत्याच्या पराभव व गटबाजीने कार्यकर्तेही खचले होते. असे असताना निराशेच्या वातावरणातही लढण्याचा निर्णय घेऊन ठाकरे यांनी अर्धी लढाई जिंकली. मतदारांचा प्रतिसाद मिळत असल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला. 
मात्र ठाकरे यांच्याविषयी सर्वांनाच चिंता सतावत होती. त्यांचे संपूर्ण राजकीय करिअरच डावावर लागले होते. पक्षांतर्गत विरोधकांचाही त्यांना मोठा धोका होता. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी अनेकांनी तिकीट मिळू नये याकरिता दिल्लीत फिल्डिंग लावली होती. काहींनी या मतदारसंघावर दावेदारीसुद्धा केली होती. मात्र ठाकरे दिल्लीत गेले नाहीत. त्यांनी शांत राहून उमेदवारी मिळवली. त्यांचे समर्थक आपला मतदासंघ सोडून पश्‍चिमेत कामाला भिडले. पक्षांतर्गत विरोधकही जुळले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनीही साथ दिली. त्याचा एकत्रित परिणाम झाला. सुधाकर देशमुख यांच्यावरच्या नाराजीचाही फायदा झाला. विकास ठाकरे सहा हजार मतांच्या फरकांनी विजयी झाले आणि त्यांचे आमदार होण्याचे स्वप्नही पूर्ण झाले. 
उत्तरमधून नितीन राऊत यांना उमेदवारी देऊ नये याकरिता उत्तरचे सारे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी दिल्लीपर्यंत मजल मारली. तक्रारी केल्या. मात्र ज्येष्ठांनी कानावर हात ठेवून राऊत यांच्याच पारड्यात वजन टाकले. नगरसेवक मनोज सांगोळे यांनी बंड केले. मात्र त्यांना वेळीच आवरण्यात कॉंग्रेसला यश आले. त्यानंतर बंडखोरीच्या पावित्र्यात असलेले कार्यकर्ते बिथरले. त्यांचा विरोध मावळला. काहींनी उगाच दोषारोप नको म्हणून दुसऱ्या मतदारसंघात स्वतःला झोकून दिले. अगदीच टोकाचा विरोध असलेले काहीजण शांत बसून नशिबावर सर्व सोडून दिले. यामुळे कॉंग्रेस समोरची मतविभाजनाची मोठी अडचण दूर झाली. डॉ. मिलिंद माने यांच्यावरची मतदारांची नाराजी मतपेटीतून व्यक्त झाली. बसपाचा हत्ती अपेक्षेनुसार चालू शकला नसल्याने नितीन राऊत विजयी झाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com