भाजपच्या असंतुष्टांना कॉंग्रेसची फूस; चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी (खुले) निघाले. नव्या अध्यक्षपदाची निवड याच महिन्यात होणार आहे. जिल्हा परिषदेत भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे भाजप बिनधास्त आहे, तर कॉंग्रेस आपली शक्ती पणाला लावत आहे. 

चंद्रपूर : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अडीच वर्ष सत्तेत राहूनही फारसे हाती न लागलेल्या भाजपच्या असंतुष्टांना कॉंग्रेसने गळाला लावण्याचे सध्या प्रयत्न सुरू केले आहे. त्यांना सभापतिपदाचे आमीषही दाखविण्यात आल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसने बैठकांचे सत्र सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी कॉंग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूरकर यांनी वसंत भवनात सदस्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीला त्यांच्याच काही सदस्यांनी बुट्टी मारली. 

भाजपचे काही सदस्य नाराज

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी (खुले) निघाले. नव्या अध्यक्षपदाची निवड याच महिन्यात होणार आहे. जिल्हा परिषदेत भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे भाजप बिनधास्त आहे, तर कॉंग्रेस आपली शक्ती पणाला लावत आहे. गेल्या अडीच वर्षांत कामे मिळाली नसल्याचे कारणे समोर करून जिल्हा परिषदेतील भाजपचे काही सदस्य नाराज आहेत. यातील अनेक सदस्यांनी आपली नाराजीही सभापतींसमोर व्यक्त केली होती. नाराज असलेल्या भाजपच्या याच सदस्यांनाच आता कॉंग्रेसने आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. 

सभापतिपदाची ऑफर 

जिल्हा परिषदेत भाजपचे 36, तर कॉंग्रेसचे 20 सदस्य आहेत. सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेसला आणखी नऊ सदस्यांची गरज आहे. या नऊ सदस्यांची जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न कॉंग्रेसकडून सुरू आहे. सत्ता स्थापन झाल्यास सभापतिपदाची ऑफरही त्यांना देण्यात आल्याची माहिती आहे. शुक्रवारी जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभा होती. या सभेनंतर कॉंग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूरकर यांनी आपल्या सदस्यांची वसंत भवनात बैठक बोलविली होती. या बैठकीला तीन-चार सदस्य गैरहजर होते, अशी माहिती आहे. काही कामानिमित्ताने ते बैठकीला हजर राहू शकले नसल्याचे सांगण्यात येत आहेत. मात्र, हे सदस्य गटनेत्यांकडून नाराज असल्याने गैरहजर असल्याची ाहिती आहे. या बैठकीला भाजपचा एक सदस्य उपस्थित होता, अशी माहिती आहे. 

गुरनुले, बोडलावार, जीवतोडेंच्या नावाची चर्चा 

जिल्हा परिषद अध्यक्षपद महिला (खुला) असे निघाले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अध्यक्षपदासाठी महिला सदस्यांत स्पर्धा वाढली आहे. सध्या अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष संध्याताई गुरनुले, कृषी सभापती अर्चना जीवतोडे आणि वैष्णवी बोडलावार यांच्या नावाची चर्चा सुरू. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress seduces BJP dissidents; Chandrapur Zilla Parishad Election