महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे षड्‌यंत्र : कोण म्हणाले असे...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार भाजपकडून सद्य:स्थितीत सुरू आहे. जनता कर्फ्यूसारखे प्रकार करून जनतेचे कैवारी असल्याचा आव आणला जात आहे. राज्यात कोरोना विषाणूजन्य आजारांचा प्रसार होत असताना हेच भाजपचे नेते गोरगरिबांना अन्नधान्य वाटताना दिसले नाहीत. त्या वेळी ते भूमिगत झाले होते. 

वणी (यवतमाळ) : कोरोना आजाराने महाराष्ट्रासह संपूर्ण जगाला कवेत घेतले आहे. महाराष्ट्रात बाधितांची संख्या मोठी जरी असली, तरी महाविकास आघाडी सरकार परिस्थिती योग्य प्रकारे हाताळत आहे. त्यामुळे विरोधक ठाकरे सरकारला बदनाम करण्याचे षड्‌यंत्र रचत आहेत. 

देशातच कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वणी परिसरात मे महिन्यापर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्रल मुंबईवरून आलेले दाम्पत्य कोरोना संक्रमित निघाल्याने निकटच्या संपर्कात आलेल्या बाधितांची संख्या सातवर पोहोचली आहे. त्यामुळे शहरात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी सोमवारपासून पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. मात्र, खासदार धानोरकर यांनी जनता कर्फ्यूवर आक्षेप घेत आधीच आर्थिक संकटात असलेल्या व्यावसायिकांना व जनतेला वेठीस धरू नये, असे स्पष्ट केले होते. 

महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार भाजपकडून सद्य:स्थितीत सुरू आहे. जनता कर्फ्यूसारखे प्रकार करून जनतेचे कैवारी असल्याचा आव आणला जात असल्याचा आरोप खासदार धानोरकर यांनी केला आहे. मागील तीन महिन्यांपासून राज्यात कोरोना विषाणूजन्य आजारांचा प्रसार होत असताना हेच भाजपचे नेते गोरगरिबांना अन्नधान्य वाटताना दिसले नाहीत. त्या वेळी ते भूमिगत झाले होते. 

हेही वाचा : पेरले पण उगवले नाही...आता घोंगावतेय हे संकट 

टाळेबंदीमुळे अनेक उद्योग व्यवसाय डबघाईस आले आहेत. अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कोणताही प्रयत्न केंद्र शासनाकडून होताना दिसत नाही. उलट, जनता कर्फ्यूसारखे प्रकार करून नागरिकांना अडचणीत पकडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू असल्याने महाविकास आघाडीत असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेकडून याचा जाहीर निषेध आम्ही करीत असल्याचे खासदार धानोरकर यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप व कॉंग्रेस आमने-सामने आल्याचे दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Conspiracy of defame