esakal | निधीअभावी सहा महिन्यांपासून अनेकांचे घरकुल बांधकाम अर्धवट, लाभार्थ्यांचा मोडक्या घरात संसार
sakal

बोलून बातमी शोधा

construction of many houses has been incomplete due to lack of funds in wardha

आमदार दादाराव केचे यांनी आर्वी मतदारसंघातील तक्रारींच्या निवारणार्थ वर्धा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ही मागणी केली. आष्टी नगरपंचायत क्षेत्रात पहिल्या टप्प्यात 267 घरकुल बांधकामाला मंजुरी देण्यात आली.

निधीअभावी सहा महिन्यांपासून अनेकांचे घरकुल बांधकाम अर्धवट, लाभार्थ्यांचा मोडक्या घरात संसार

sakal_logo
By
रूपेश खैरी

आष्टी (शहीद) (जि. वर्धा) : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आष्टी शहरात सुरू असलेल्या घरकुल बांधकामाचा दुसरा हप्ता गेल्या सहा महिन्यांपासून थकला आहे. यामुळे शहरातील 222 घरकुल लाभार्थी अडचणीत आले आहेत. या लाभार्थ्यांनी पहिल्या हप्त्यात असलेले घर तोडून नवे बांधकाम सुरू केले. पण पुढचा हप्ता आला नसल्याने अनेकांना या मोडक्‍या घरात संसार करावा लागत आहे.  

आमदार दादाराव केचे यांनी आर्वी मतदारसंघातील तक्रारींच्या निवारणार्थ वर्धा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ही मागणी केली. आष्टी नगरपंचायत क्षेत्रात पहिल्या टप्प्यात 267 घरकुल बांधकामाला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी 222 लाभार्थ्यांनी गेल्या सहा महिन्यांपूर्वी बांधकाम सुरू केले. घरकूल बांधकामाची ही योजना 2 लाख 50 हजार रुपयांची असून लाभार्थ्यांना आतापर्यंत एक लाख रुपये मिळाले नाही. निधीचा दुसरा हप्ता गेल्या सहा महिन्यापासून राज्य शासनाकडून आला नसल्याने शहरातील सर्व घरकूल बांधकामे अर्धवट अवस्थेत ठप्प पडली आहे. यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. या बाबींची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी अप्राप्त निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्याची मागणी विजयकर यांनी केली आहे. यावेळी शहर अध्यक्ष अ‌ॅड. मनीष ठोंबरे व लाभार्थी उपस्थित होते. खासदार रामदास तडस यांनीसुद्धा घरकुलाच्या अप्राप्त निधीबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे आणि लवकरच निधी प्राप्त होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला आहे.

हेही वाचा - ऐन सणासुदीच्या दिवसात बोंडअळीमुळे कापूसही हातचा गेला, सांगा आम्ही जगायचं कसं?

449 लाभार्थी प्रतीक्षा यादीत -
पक्‍के घर नसलेल्या अनेक नागरिकांनी नगरपंचायतकडे अर्ज केले असून 449 लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी आहे. मात्र, पहिल्याच टप्प्यातील कामे निधीअभावी अपूर्ण असल्याने या दुसऱ्या यादीला मंजुरी देणे तूर्तास टाळले आहे. शासनाने अर्धवट बांधकाम असलेल्या मंजूर लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याची मागणी या लाभार्थ्यांकडून नगरपंचायतीला करण्यात आली आहे. 
शासनाने घरकुल मंजूर करून पहिला हप्ता दिला. यामुळे लाभार्थ्यांनी त्यांचे राहते घर मोडून नव्या घराचे बांधकाम सुरू केले. घराचा पाया होईपर्यंत पहिला हप्ता संपला. यामुळे लाभार्थ्यांना दुसरा हप्ता तत्काळ देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 
- अशोक विजयकर, गटनेते, भाजप नगरपंचायत आष्टी

loading image
go to top