ऐन सणासुदीच्या दिवसात बोंडअळीमुळे कापूसही हातचा गेला, सांगा आम्ही जगायचं कसं?

टीम ई सकाळ
Monday, 26 October 2020

आपल्या हाताने पेरणी, मशागत करून लहान बाळासारखे जगलेले कापसाचे पिकावर ट्रॅक्टर फिरवले, तर खायचे काय? असा प्रश्न वरुणसमोर होता. त्यामुळे त्याने दोन एकरातील कापूस पिकावर त्याने तणनाशक फवारले.

कुंभा ( यवतमाळ ) : हिरव्या आईच्या गर्भात बियाणं रोवून त्याने मोठ्या आशेने स्वप्न पाहिले. पांढरे सोने पिकणार व सारे दुःख हटणार, ही आशा घेऊन तो शेतात राबराब राबला. पण आता बोंडअळी पाहून हादरला व कापसावर तणनाशक फवारून धाय मोकळून रडला. आता खायचे काय? हाच प्रश्न त्याला भेडसावत आहे. ही व्यथा आहे कुंभा येथील तरुण शेतकरी वरूण ठाकरे यांची...

हेही वाचा - `दीक्षा`तून घरोघरी पोहोचतो बाबासाहेबांचा विचार;...

वैदर्भीय शेतकरी कापूस पिकवतो. खरीप पीक म्हणून राबराब राबतो. त्याच्यावर कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येतात. पदवीधर असलेल्या वरूण ठाकरे  या 36 वर्षीय तरुण शेतकऱ्याला दोन एकरातील पिकांवर हिंमत होती. दरवर्षी वरूणला पावसाने दगा दिला तरी ओलिताची सोय असल्याने तो हिंमतीने शेती करतो. त्याची पत्नी सोनूने देखील शिक्षण शास्त्रात पदवी मिळविली आहे. ती देखील खांद्याला खांदा लावून बळीराजाचा मनगटाला बळ देते. आई, दोन लहान मुलं व पती, पत्नी असा राजा-राणीचा संसार चालवणार्‍या वरूणला यावेळेस शेतातील पांढरे सोने पाहून मोठा आनंद झाला. एक लाखांचे कर्ज आपण यंदाच्या पिकावर फेडून टाकू, अशी  आशा त्याला होती. ऐनवेळी बोंड अळीच्या जीवघेण्या हल्याने कापूस अन् वरुण दोघेही हादरले. केवळ चार क्विंटल कापूस घरी आल्यानंतर ही बोंड आळी संपूर्ण पीक मातीत घालेल हे कळून चुकले. 

हेही वाचा - प्रदूषणमुक्तीवर महामेट्रोचा भर; मेट्रो स्टेशनवर...

आपल्या हाताने पेरणी, मशागत करून लहान बाळासारखे जगलेले कापसाचे पिकावर ट्रॅक्टर फिरवले, तर खायचे काय? असा प्रश्न वरुणसमोर होता. त्यामुळे त्याने दोन एकरातील कापूस पिकावर त्याने तणनाशक फवारले. त्यानेही हातचे पीक वाया गेले. त्यामुळे तो शेतातच धाय मोकलून रडू लागला. आता आम्ही जगायचं कसं? असा प्रश्नही त्याने यावेळी उपस्थित केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pink bollworm on cotton in kumbha of yavatmal