या गावात नळाद्वारे होतो नदीच्या पुराचा पाणीपुरवठा...दूषित पाण्यामुळे गावकऱ्यांना त्वचारोगाची लागण

विश्‍वपाल हजारे
Thursday, 23 July 2020

लाखांदूर तालुक्‍यातील भागडी येथे 694 कुटुंबे राहत असून गावाची लोकसंख्या साडेतीन हजार आहे. गावात चुलबंद नदीपात्रातील विंधनविहिरीतील पाण्याचा उपसा करून दोन पाण्याच्या टाकीत साठवले जात होते. मात्र, विंधनविहिरीतील जलस्रोत बंद पडले. त्यामुळे या विहिरीत पुराचे गढूळ व दूषित पाणी येत आहे.

लाखांदूर (जि. भंडारा) : तालुक्‍यातील भागडी गावाला 20 वर्षांपासून पिण्याचा पाणीपुरवठा करणारे चुलबंद नदीपात्रातील विंधनविहिरीचे स्रोत बंद पडले आहे. आता गावकऱ्यांना नदीला येणाऱ्या पुराचा गाळयुक्त दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. या पाण्यामुळे गावकऱ्यांच्या अंगावर खाज येण्याचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे आजारापासून बचाव करण्यासाठी गावकऱ्यांना दोन किलोमीटर अंतरावरील शेतातून विहिरीचे पाणी आणावे लागत आहे.

तालुक्‍यातील भागडी येथे 694 कुटुंबे राहत असून गावाची लोकसंख्या साडेतीन हजार आहे. गावात चुलबंद नदीपात्रातील विंधनविहिरीतील पाण्याचा उपसा करून दोन पाण्याच्या टाकीत साठवले जात होते. हेच पाणी नळयोजनेद्वारे गावकऱ्यांना पिण्यासाठी पुरवठा केला जातो. मात्र, विंधनविहिरीतील जलस्रोत बंद पडले. त्यामुळे या विहिरीत पुराचे गाळयुक्त गढूळ व दूषित पाणी येत आहे.

नळांना येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याने काही नागरिक हातपंपाचे पाणी पिण्यास वापरत आहेत. गावात एकूण 27 हातपंप आहेत. येथील बरेचसे नागरिक दोन किलोमीटर अंतरावरील शेतातील विहिरीचे पाणी पिण्यासाठी आणत आहेत. नळयोजनेअंतर्गत पुरवठा होणाऱ्या पाण्याचा वापर आंघोळ करणे, कपडे धुणे व जनावरांना पिण्यासाठी केला जात आहे.

आजाराची लागण

गावात दूषित पाणीपुरवठा सुरू झाल्यापासून 45 टक्‍के महिला-पुरुषांना अंगाला खाज येणे, हगवण अशा आजाराचा त्रास झाला. त्यावर औषधोपचारासाठी काही जणांनी उमरेड, भंडारा व इतर गावांतील खासगी दवाखान्यातून उपचार करून घेतले. तरीही, अनेकांच्या अंगावर डाग निर्माण झाल्याचे पीडितांनी सांगितले आहे. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे गावात विविध आजारांची लागण होण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. गाळयुक्त गढूळ व दूषित पाण्याचा नळयोजनेद्वारे पुरवठा होत असल्याने गावकऱ्यांनी असंतोष व्यक्त केला आहे.

नऊशे लोकांना सुटली खाज

गावात अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. नदीच्या पुराचे पाणी गावकऱ्यांना पुरवठा केले जाते. त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. दूषित पाण्यामुळे गावातील सुमारे 900 ते एक हजार लोकांना खाजेचा त्रास होत आहे. त्यांना उपचारासाठी बाहेरगावी खासगी दवाखान्यात जाऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मात्र, ग्रामपंचायत समितीने यावर कोणतीही उपाययोजना केली नाही. महिलांना पिण्यासाठी दोन किलोमीटर अंतरावरून चिचोली शिवारातून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याची समस्या त्वरित मार्गी लावण्यात यावी, अशी मागणी माजी उपसरपंच गणेश जिभकाटे यांनी केली आहे.

असं घडलंच कसं : होय हे खरे आहे, वैनगंगेने गिळली शेती !

निर्जंतुकीकरण करूनच पाणी प्यावे
नदीपात्रातील विहिरीतील जलस्रोत बंद पडल्याने त्यात पुराचे गढूळ व दूषित पाणी साठवले जाते. योजनेद्वारे त्याच टाकीतील पाणीपुरवठा केला जात आहे. आजार टाळण्यासाठी गावकऱ्यांना निर्जंतुकीकरण करूनच पाणी पिण्यासाठी वापरावे, अशा सूचना दिल्या आहेत. जलशुद्धीकरण केंद्रासाठी प्रस्तावसुद्धा पाठवला आहे.
- ताराचंद मातेरे, सरपंच, भागडी.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contaminated water in this village causes skin diseases to the villagers