नगरपालिकेच्या नियोजनाचा उडाला फज्जा, संततधार पावसाने तुंबले शहर

rain
rain

भंडारा : पंधरा दिवस दडी मारल्यानंतर रविवारी व सोमवारी शहरात मुसळधार पाऊस झाला. दोन दिवस झालेल्या या संततधार पावसाने शहरातील बऱ्याच वसाहतींमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली. दरम्यान याप्रकारामुळे नगरपालिकेच्या नियोजनातील फोलपणा पुन्हा उघडकीस आला आहे. रविवारी भंडाऱ्यात सरासरी 105 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

शहरात रविवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने मोठाबाजार, बैरागी वाडा, तकीया वॉर्ड, खातरोड, शुक्रवारी, शास्त्रीनगर परिसरातील पावसाळी वाहिन्या, नाले तुंबून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. मोठे नाले व नाल्यांची योग्य प्रकारे सफाई न झाल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून शहराच्या खोल भागात ठिकठिकाणी नाल्या तुंबण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, व स्वच्छता केल्याचा पालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. शहरात रविवारी व आज सोमवारीसुद्धा जोरदार पाऊस झाला. बैरागीवाडा, खातरोड, इंदिरा गांधी वॉर्ड परिसरातील अनेक घरांत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. काही घरांमध्ये अक्षरशः गुडघ्याइतके पाणी भरले होते. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेकांना रात्रभर घरात घुसलेले पाणी उपसावे लागले. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली होती. याशिवाय शुक्रवारी वॉर्डातील पाणी शास्त्रीनगर वसाहतीमधून वाहत होते. चौकादरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती.

मुसळधार पावसाने अनेक सखल भागातील रस्ते जलमय झाले. पावसाच्या पाण्याचा निचराच होत नसल्यामुळे अनेक वसाहतींना तलावाचे स्वरूप आले होते. शहरासह परिसरात रविवारी सायंकाळी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान जवळपास 105 मिलिमीटर मुसळधार पाऊस झाला. सोमवारीसुद्धा पावसाने पाचच्या दरम्यान हजेरी लावली. पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे शहराच्या अनेक भागातील वसाहती जलमय झाल्या. खुल्या मैदानांची तळी झाली. अनेक सखल भागातील घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले. घरातील गृहोपयोगी साहित्य पाण्याखाली गेले.

सर्व रस्ते पाण्याखाली
जोरदार पावसाने रस्त्यावरून पाणी प्रचंड वेगाने वाहत होते. पावसाचा जोर एवढा होता की, या भागातील नाल्यांवरून देखील दोन फुटापर्यंत पाणी वाहत होते. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर रस्त्यावरील पाणी हळूहळू ओसरू लागले.
शास्त्री चौक, खातरोड, मोठा बाजार, शासकीय रुग्णालय, बसस्थानक आदी भागातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते. राष्ट्रीय महामार्गाच्या खाली असलेला सखल भागदेखील जलमय झाला होता.

पालिकेचे पितळ उघडे...
पालिकेने मॉन्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबविली. मात्र, जोरदार पावसाने या मोहिमेचे पितळ उघडे पाडले. बसस्थानक रस्त्यावरील मोठा नाला व अन्य काही नाले, नाल्या उपसल्या की झाली स्वच्छता मोहीम, असेच गेल्या काही वर्षापासूनच चित्र आहे. शहरातील मोठ्या नाल्यांचे रूपांतर छोट्या नाल्यांमध्ये झालेले असून पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता न राहिल्यामुळे मुसळधार पाऊस येताच संपूर्ण भाग जलमय होऊन जातो. नाल्या अरुंद करणे, त्यावर अतिक्रमण करणे, मार्ग बदलणे, त्यावर बांधकामे करणे आदी कारणांमुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्याचा फटका नागरिकांना सोसावा लागत आहे.
हेही वाचा - निलंबित शिवसेनेचा शहरप्रमुख कडवच्या पत्नीला अटक
नाल्यांवरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष...
जुन्या वॉर्डासह शहराच्या चोहोबाजूंनी शेकडो वसाहती आहेत. परंतु त्या वसाहतींचे सांडपाणी बाहेर येण्यास मार्ग नाही. एकमेकांना जोडून नाल्यांचे जाळेच नसल्यामुळे अनेक वसाहतींमध्येच पाणी अडकून पडते. तसेच अनेक भागात घरे खाली व रस्ते वर अशी परिस्थिती असल्यामुळे पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात जात असल्याचे चित्र अनेक भागात दिसून येते. नाल्यांवर अतिक्रमण झाल्यानेसुद्धा ही समस्या गंभीर झाली आहे. त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com