नुकत्याच बांधलेल्या रस्त्यांवर खड्डे, कंत्राटदाराच्या गाडीला अपघात

मिलिंद उमरे
Tuesday, 16 February 2021

आज देखील कुरखेडा येथील कंत्रादाराच्या चारचाकीला अपघात झाला असून ते सुदैवाने बचावले. त्यामुळे या बांधकामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उपसरपंच अशोक गावतुरे यांनी केली आहे. 

कोरची (जि. गडचिरोली) : तालुक्‍यात कोट्यवधी रुपये खर्च करून नव्याने बांधकाम करीत असलेले पंतप्रधान सडक योजना व मुख्यमंत्री सडक योजनेतील बेडगाव-बेलगाव-बोरी रस्त्याचे एक महिनाआधी बांधकाम करण्यात आले. मात्र, या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून अपघात होत आहेत. आज देखील कुरखेडा येथील कंत्रादाराच्या चारचाकीला अपघात झाला असून ते सुदैवाने बचावले. त्यामुळे या बांधकामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उपसरपंच अशोक गावतुरे यांनी केली आहे. 

हेही वाचा - क्या बात है! शेतकरीपुत्राची गगनभरारी; बनला पोलिस उपनिरीक्षक;अख्ख्या गावात फटाक्‍यांची आतषबाजी 

कंत्राटदाराकडून वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी टक्‍केवारी मागणे म्हणजे रस्त्याचा सत्यानाश आहे. जो प्रत्यक्षात काम करतो आहे, त्याचा नफा या टक्‍केवारीमुळे कमी होतो आणि रस्त्याच्या दर्जावर, गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो, हे मला नको आहे, असे केंद्रीय रस्ते विकास महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी  सांगितले. तरीही कोरची तालुक्‍यात मुख्यमंत्री सडक योजना व पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या बांधकाम जबाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. एका महिन्यापूर्वीच बेडगाव-बेलगाव-कोहका-जामनारा या रस्त्याचे बांधकाम प्रमोद कन्ट्रक्‍शन कंपनीकडून केले असून हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची टीका होत आहे. या रस्त्यावर सरकारचे कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. पण रस्त्याची गुणवत्ता मात्र शून्य आहे. त्यामुळे कुरखेडावरून कोटगुलकडे जात असलेले कंत्राटदार बब्बू मस्तान यांच्या गाडीचा अपघात जामनारा समोरील उखडलेल्या रस्त्यावरील खड्डा चुकवताना झाला.

हेही वाचा - मन सुन्न! कोळसा खाणीत घडला मोठा अनर्थ; चालकाचा डंपरखाली दबून मृत्यू   

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टाकलेली चुरी, गिट्टीवरून जात असताना नियंत्रण गेल्याने अपघात झाला. पण सुदैवाने कसलीही दुखापत झाली नाही. ते थोडक्‍यात बचावल्याने अनर्थ टळला आहे. पण या रस्त्यावर असे बरेच अपघात झाले असून यापूर्वी बेलगाव येथील रामलाल नुरूटी यांच्या मुलाचा अपघात होऊन खूप मोठी दुखापत झाली होती. तेव्हा त्याला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठ दिवस उपचार करण्यात आले होते. तालुका मुख्यालयापासून चार किमी अंतरावरील कामे निकृष्ट दर्जाचे होत आहेत, तर ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल, असा प्रश्‍न विचारला जात आहे. तालुक्‍यातील संपूर्ण कामांची विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गावतुरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना व जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री सडक योजनेचे कार्यकारी अभियंता दिलीप देवळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा - Fastag Update : फास्टॅग असूनही भरावा लागला दुप्पट टोल, वाचा काय आहे कारण; टोल नाक्याबाहेर थाटली...

भूमिपूजनाची घाई -
नक्षलप्रभावीत कोरची तालुक्‍यात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सडक योजना व पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत कोरची -बेतकाठी -बोरी, भिमपूर-नांदळी-जैतानपार, बेलगाव -सातपूती-बेलगाव,जांभळी-कोरची, बोरी-कोटगुल, कोटगुल-खसोडा, कोटगुल-वाको, देऊळभट्टी -गोटाटोला, गोटाटोला -कामेली ग्यारापत्ती-मोठा झेलीया, वडगाव-ग्यारापत्ती अशा 12 कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. पण आचारसंहिता लागू होणार म्हणून विरोधी पक्षाच्या स्थानिक लोकप्रतिनिधीला डावलून भूमीपूजन करण्यात आले होते. भूमिपूजनानंतर दोन वर्षांत खूप निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याचे दिसून आले. या कामाची देखरेख करीत असलेल्या कनिष्ठ अभियंता, उप अभियंता व कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री सडक योजना व पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: contractor vehicle meet accident due to potholes on newly constructed road in gadchiroli