तंबाखू खाणाऱ्यांचे आता होणार हाल..कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विक्रेत्यांनी कसली कंबर.. वाचा सविस्तर 

अविनाश नारनवरे
Wednesday, 29 July 2020

खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणारे सातत्याने थुंकत असतात आणि थुंकण्यातून कोरोना संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री पूर्णतः बंद करण्याचा निर्णय भामरागड किराणा व्यापारी असोसिएशनने बैठकीत घेतला.  असोसिएशनच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

भामरागड(जि. गडचिरोली) : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. प्रशासनाकडून कोरोनावर मात करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या उपाय योजना राबवल्या जात आहेत. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही आहे.  प्रशासनाचे निर्देश लक्षात घेत भामरागड किराणा व्यापारी असोसिएशनने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणारे सातत्याने थुंकत असतात आणि थुंकण्यातून कोरोना संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री पूर्णतः बंद करण्याचा निर्णय भामरागड किराणा व्यापारी असोसिएशनने बैठकीत घेतला.  असोसिएशनच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

हेही वाचा - तिला माहीत होतं आपण मरणार; तरी नियतीला शरण न जाता मिळवले 75 टक्के; मात्र, कौतुक ऐकण्यासाठी ती आज नाही...

व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत निर्णय 

कोरोना संसर्गाचा धोका रोखण्यासाठी तंबाखू, खर्रा, नस, गुडाखू, सिगारेट, बिडी यासारखे तंबाखूजन्य पदार्थ विकण्यावर राज्यासह जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. ही बंदी यशस्वी करणे आपली नैतिक जबाबदारी असल्याचे लक्षात घेत भामरागड किराणा व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. बैठकीला भामरागड असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बडगे, उपाध्यक्ष महेश कोमकोंटीवार, सचिव सलीम शेख, किशोर भांडेकर यासह इतर सदस्य, मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर, तालुका संघटक केशव चव्हाण, प्रेरक चिन्नू महाका, आबिद शेख आदी उपस्थित होते. 

प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे 

कोरोना संसर्गाचा धोका तालुक्‍यात व जिल्ह्यात पसरू नये, यासाठी प्रशासनाच्या आवश्‍यक सूचनांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जिल्हा प्रशासनाने तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी लक्षात घेत भामरागड शहरातील दुकानांमध्ये खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ विकणार नसल्याचा निर्णय असोसिएशनने यावेळी जाहीर केला. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सर्व व्यापाऱ्यांनी निर्णयाची अंमलबजावणी करावी व प्रशासनाला आवश्‍यक सहकार्य करावे, असा संवाद साधत सर्व उपस्थित व्यापाऱ्यांना संतोष सावळकर यांनी यावेळी आवाहन केले. 

जाणून घ्या - घरात सापडलेली तांब्याची वस्तू निघाली तब्बल 1500 वर्ष जुनी; इतिहास बघितला आणि सर्वांनाच बसला धक्का..

व्यक्त केला निर्धार... 

हा असोसिएशनने घेतलेला निर्णय खूप महत्त्वाचा असून कोरोना नियंत्रणासाठी यामुळे मदत होणार आहे. जे व्यापारी बैठकीला येऊ शकले नाही त्यांनी ठरलेल्या निर्णयाची माहिती द्यावी, असेही यावेळी सांगण्यात आले. अध्यक्ष बडगे यांनीही सर्व उपस्थितांना आवाहन करत हे भामरागड शहरातील जनतेसाठी उचित पाऊल आहे. आम्ही हा निर्णय नक्‍कीच अंमलात आणू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 
 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for controlling corona tobacco will ban in bhamragadh