अमरावती - शहराच्या ‘सिटी बर्ड’ निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून ‘तांबट’ या पक्षाने ही निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे आजपासून तांबट हा अमरावती शहराचा पक्षी म्हणून ओळखल्या जाणार आहे. .आपल्या देशाचे व राज्याची जशी मानचिन्ह असतात तसा अमरावती शहराचा ‘सिटी बर्ड’ असावा यासाठी वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्थेच्या पुढाकारातून व अमरावती महापालिकेच्या सहकाऱ्याने शहर पक्षी निवडणूक आयोजित करण्यात आली होती. या निवडणुकीत उमेदवार असलेले पक्षी अमरावती शहरात दिसणारे व पर्यावरणात विशेष महत्त्व असलेले होते.पक्षी अभ्यासक व अनेक संस्थांच्या समन्वयातून हे पक्षी ठरविण्यात आले होते. अमरावतीच्या जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या सहा उमेदवार पक्ष्यांमध्ये ‘जंगलाचा शेतकरी’ अशी ओळख असलेला राखी धनेश, अतिशय सुंदर रंग व आपल्या उक्क उक्क आवाजासाठी प्रसिद्ध असलेला तांबट, डौलदार तुरा व लांब चोच असलेला हुदहूद म्हणजेच हुप्पू, रात्री वावरणारा घुबड प्रजातीमधील ठिपकेवाला पिंगळा, चपळ शिकारी पक्षी शिक्रा व सर्वांना परिचित असलेला भारद्वाज या सहा पक्ष्यांचा समावेश होता..शहराचे प्रतिनिधित्व करणारा पक्षी निवडण्याकरिता महापालिकेच्या संकेतस्थळावर आणि वेक्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर मतदानासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या या निवडप्रक्रियेत एकूण ४५४५ नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला.या निवडणुकीच्या निकालाची घोषणा रविवारी (ता.३०) सकाळी वेलकम पॉइंट येथे पार पडलेल्या हॅपी स्ट्रीट कार्यक्रमात करण्यात आली. महापालिका आयुक्त सौम्या शर्मा, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्या उपस्थितीत वेक्स संस्थेचे सचिव डॉ. जयंत वडतकर यांनी या निवडणुकीचा निकाल वाचून दाखविला..त्यानंतर मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी ‘तांबट’ पक्ष्याचे नाव ‘शहर पक्षी’ म्हणून घोषित केले. यावेळी व्यासपीठावर वेक्सचे कोषाध्यक्ष डॉ. गजानन वाघ, सहसचिव डॉ. मंजूषा वाठ, किरण मोरे, सौरभ जवंजाळ, अॅड राजमेहेर निशाने, डॉ. पवन राठोड, प्रशांत निकम, आनंद मोहोड, अभिषेक पाटील, संकेत राजूरकर, दीपाली बाभूळकर यांची उपस्थिती होती..‘तांबट’ला मिळाली १४१४ मतेयामध्ये झालेल्या एकूण ५४४५ पैकी सर्वांत जास्त म्हणजे १४१४ इतक्या लोकांनी ‘तांबट’ पक्षाला आपली पसंती दर्शविली. त्यानंतर १०३२ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर भारद्वाज राहिला. राखी धनेशाला ९९८, हुदहूदला ७९६, पिंगळा ६५५ तर शिक्रा पक्षाला ५५१ मते मिळाली..आवाज ही पहचान है!उंच व गर्द झाडाच्या टोकावरून दूरपर्यंत घुमणारा या पक्ष्याचा आवाजच त्याची ओळख आहे. चिमणी एवढ्या आकाराचा मात्र अतिशय आकर्षक रंगाच्या या पक्ष्याचे पंख हिरवे, पोट पांढुरके व त्यावर हिरवट पिसे आहेत. त्याच्या कपाळावर लाल भडक असा मोठा ठिपका व तसाच गळ्यावर सुद्धा लाल व पिवळ्या रंगाचा आडवा पट्टा असतो. या लाल रंगामुळे तो जास्तच उठून दिसतो.आखूड जाड चोच व चोचीच्या बुडाशी राठ मिशा ही त्याची विशेष ओळख आहे. याचे शेपूट आखूड व पाय गुलाबी रंगाचे असतात. या पक्ष्याचे मुख्य अन्न हे फळे असल्याने तो वड, उंबर, पिंपळ अशा झाडांवर दिसतो..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.