अभिनंदन! तुम्हाला गोंडस मुलगा झाला; मात्र थांबा, तुम्हाला बाळाला भेटता येणार नाही, काय झाले असे?...वाचा

अनुप ताले
Tuesday, 26 May 2020

तो कंत्राटी नोकरीनिमित्ताने यवतमाळ येथे पत्नीसह राहायला गेला. तेथे भाड्याने घर घेतले. आई-वडील मात्र अकोल्यातच राहतात. त्याची पत्नी गर्भवती होती.

अकोला : अभिनंदन...तुम्हाला गोंडस मुलगा झाला. वडील झाल्याचे एकून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने प्रशासनाकडून जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी घेतली आणि थेट गडचिरोलीचे रुग्णालयात गाठले. तो रुग्णालयात पोहोचला, त्याची आतुरता वाढत होती, आता तो बाळाला भेटणार... तेवढ्यात आवाज आला...थांबा तुम्हाला बाळाला भेटता येणार नाही!

ही आपबीती आहे अकोल्याच्या एका युवकाची. तो कंत्राटी नोकरीनिमित्ताने यवतमाळ येथे पत्नीसह राहायला गेला. तेथे भाड्याने घर घेतले. आई-वडील मात्र अकोल्यातच राहतात. त्याची पत्नी गर्भवती होती. पहिले बाळंतपण मुलीच्या माहेरी करायचे, असा दाम्पत्यांनी निर्णय घेतला. त्याने पत्नीला गडचिरोली जिल्ह्यातील गावी (माहेरी) नेऊन सोडले. सर्व काही व्यवस्थित सुरू होते. प्रसुतीचे दिवस जवळ आले. 

हेही वाचा - Video : या माणुसकीला सलाम...! कोरोनाबाधित हिंदू व्यक्तीवर मुस्लिम बांधवांकडून अंत्यसंस्कार

लवकरच घरात नातवंडं येणार याची त्याच्या आई-वडिलांना उत्कंठा लागली होती. एक दिवस त्याला निरोप मिळाला... तुम्ही एका गोंडस मुलाचे वडील झालात...त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने लगेच आई-वडिलांना ही शुभवार्ता कळवली, कुटुंब आनंदविभोर झाले. बाळाला भेटण्यासाठी सर्वजण आतूर झाले परंतु, त्यांचा आनंद लॉकडाउनने हिरावून घेतला. याच दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले होते. 

आवश्यक वाचा - आंगण-रणांगण आंदोलन ट्रोलनंतर भाजपमध्ये धुसफूस; पक्षाचे ध्येय धोरणांवर आक्षेप घेत या पदाधिकाऱ्याने दिला राजीनामा

त्यामुळे जिल्ह्याबाहेर त्यांना प्रवास शक्य नव्हता. त्याला मात्र राहावले नाही, शासनाची रीतसर परवानगी त्याने घेतली आणि थेट गडचिरोलीचे रुग्णालय गाठले. तेथे पोहोचताच आरोग्य यंत्रणेने त्याला थांबवले...तुम्हाला बाळाला भेटता येणार नाही...सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तुमचा रूग्णालयातील प्रवेश आणि बाळाला भेटणे धोकादायक ठरू शकते...तेव्हा तुम्ही बाळाला सुद्धा भेटू नका...अशी सूचना आरोग्य यंत्रणेने केल्याने त्याचा हिरमोड झाला. 

परंतु, करणार काय! तेथून तो परतला आणि जवळच असलेल्या काकाच्या गावी येऊन थांबला. लवकरच आईला आणि बाळाला रुग्णालयातून सुट्टी झाली आणि ते गावी पोहोचले. हे कळताच तो सासरवाडीला पोहोचला. मात्र, कोरोनाची भीती तेथेही आडवी आली. गावकर्‍यांनी त्याचा रस्ता रोखला...पाहुणे, तुम्ही गावात येऊ नका...शेवटी त्याचा नाईलाज झाला आणि स्वतःच्या बाळाला न भेटताच त्याला उलट पावली परतावे लागले.

पहिली भेट सोशल मीडियावर
कोरोना प्रादुर्भावाची भीती लक्षात घेता आरोग्य यंत्रणेने त्याला बाळाला भेटू दिले नाही. गावकऱ्यांनी सुद्धा त्याला गावात प्रवेश नाकारला. त्यामुळे त्याला स्वतःच्या मुलाची पहिली भेट घेता आली नाही. परंतु, सोशल मीडियाने त्या बाप-लेकांची पहिली भेट घडवून आणली. पत्नीने मोबाईलद्वारे बाळाचा व्हीडिओ, फोटो काढून त्याला पाठवले आणि त्याला मुलाची आशा प्रकारे भेट झाली.

अन् चोरांनी फोडले घर
तो मुलाला व पत्नीला भेटण्यासाठी गडचिरोली येथे गेला असतानाच चोरांनी संधी साधली. एका रात्री चोरांनी कुलूप तोडून घरातील वस्तू, धान्य व रोख लंपास केली. याची माहिती त्याला शेजारच्यांनी फोन करून कळवली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona can be dangerous to meet a new born baby in akola district