प्रशासनाचे काम पॉझिटिव्ह, हा तालुका निगेटिव्ह!

dhamangao
dhamangao
Updated on

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : तालुक्‍यातील प्रमुख उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा आपापसातील समन्वय, दूरदृष्टीने घेतलेले अचूक निर्णय आणि सूक्ष्म नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी असेल तर कुठल्याही संकटाशी मुकाबला करणे शक्‍य आहे. धामणगाव तालुक्‍यातील महसूल,पोलिस व आरोग्य विभागाच्या प्रमुखांनी आपल्या कृतीतून हा धडा दिला आहे. कोरोनाशी मुकाबला करताना धामणगावच्या अधिकाऱ्यांनी 'पॉझिटिव्ह'आणि प्रसंगी कठोर भूमिका घेतली. परिणामी धामणगावने अद्याप कोरोनाला'एंट्री' करू दिलेली नाही.
अचानक कोरोनाचे संकट येऊन धडकले. पुणे,मुंबई येथून परतणारे लोंढे,अनेकांची गावी येण्यासाठीची धावाधाव तसेच परदेशवारी करून परतलेल्या लोकांमुळे धामणगावही कोरोनाग्रस्त रुग्णांच्या यादीत जाते की काय? अशी भीती होती; परंतु प्रशासनाने सुरुवातीपासूनच प्रभावी नियोजन केले. जनता कर्फ्युच्याही आधी दोन दिवस गर्दीला 'ब्रेक' देण्यासाठी जमावबंदी आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. पाठोपाठ साथरोग नियंत्रण अधिनियम लागू करुन त्यानुषंगाने उपाययोजना आखल्या. जनता कर्फ्युदरम्यान खुद्द परिवीक्षाधीन आयपीएस अधिकारी कुमार चिंता हे रस्त्यावर उतरले. दुसरीकडे तहसिलदार भगवान कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर यांनी धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या पॉलीटेक्‍निक वसतिगृहात विलगीकरण कक्ष तयार करून तालुकास्तरावर क्वारंटाईन कक्ष उभे केले. संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली. परजिल्ह्यांतून परतणाऱ्या मजुरांसह नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठीग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे यांनी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लावली. तालुकाआरोग्य अधिकारी यांनी अंगणवाडी सेविका,आरोग्य कर्मचारी,आशा सेविकांमार्फत घरोघर जाऊन सर्वेक्षण पूर्ण केले. तसेच मुख्याधिकारी सुमेध अलोणे यांनी निवारा गृह सुरू केले. शिवाय संचारबंदी, वाहतूक बंदी, टाळेबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणेने रात्रीचा दिवस करून काटेकोर अंमलबजावणी केली. तालुक्‍याच्या सर्व सीमा बंद करून चेकपोस्ट तयार केले, सोबतच आडमार्गांवरून होणारी छुपी वाहतूकही रोखली. या सर्व उपायांसोबतच 'बी प्लॅन'ही तयार ठेवला. महसूल,आरोग्य व पोलिस यंत्रणा 24 तास'अलर्ट मोड'वर काम करीत आहे. नागरिकांनीही घरात थांबून आतापर्यंत प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. या सर्व बाबींची निष्पत्ती म्हणून अद्याप धामणगावमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. धामणगावचे नाव कोरोनाग्रस्त रुग्णांच्या तालुक्‍यामध्ये नसल्याने समाधान व्यक्त होत आहे.
खाकी वर्दीतील जिगरबाजाचा तालुक्‍याला अभिमान
येथील दत्तापूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार व आयपीएस अधिकारी कुमार चिंता या जिगरबाज अधिकारी कर्तव्याला प्राधान्य देत कोरोनाला हुलकावणी देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. संचारबंदी, वाहतूक बंदी, टाळेबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणा रात्रीचा दिवस करून काटेकोर अंमलबजावणी करीत आहे. त्यामुळे त्यांच्या या कामगिरीचे तालुकावासियांनी कौतुक केले.
अधिकाऱ्यांची 'कोरोना' विरुद्धची लढाई
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. मृत्यूचे प्रचंड भय निर्माण झाले आहे. हिच परिस्थिती देश आणि महाराष्ट्रात आहे. धामणगाव तालुकास्तरावरील प्रशासकीय यंत्रणा कोरोना विषाणूचा फैलाव थांबविण्याकरिता जोरकस प्रयत्न करताना दिसत आहे. आरोग्य यंत्रणा,पोलिस विभाग, महसूलचे अधिकारी, कर्मचारी तसेच अन्य विभागांचे अधिकारी,कर्मचारीही अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी महसूल प्रशासन,नगर परिषद,आरोग्य विभाग,पोलीस प्रशासन महत्त्वाची भूमिका निभावत आहे. तहसीलस्तरावरून जबाबदारी पार पाडताना या सर्वच प्रशासकीय यंत्रणा व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सविस्तर वाचा - या शहरातील पोलिस झाले आक्रमक, नऊ जणांवर दाखल केले गुन्हे, हे आहे कारण
'लॉक डाऊन'ची घोषणा केल्यानंतर सर्व सीमा सील करण्यात आल्या.इतर जिल्ह्यातील व परराज्यातून आलेल्या नागरिकांना आहे,त्याच ठिकाणी थांबवून त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जात आहे. शहरात मजूर अडकले. त्या सर्वांची व्यवस्था प्रशासनाला करावयाची होती. प्रशासनाने आवाहन करताच शेकडो मदतीचे हात पुढे आले. तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांना वेळोवेळी प्रसंगावधान राखून निर्णय घ्यावे लागतात, त्यात अधिकारी आपले कसब पणाला लावत आहेत. अधिकाऱ्यांच्या कार्याला जनता व लोकप्रतिनिधींकडूनही चांगली साथ मिळत असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com