आदिवासी संस्कृती फायदेशीरच; या जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव फारच कमी... 

मिलिंद उमरे 
Monday, 27 July 2020

स्थानिक विशेषत: दुर्गम, अतिदुर्गम भागांतील आदिवासी कोरोनाच्या संसर्गापासून दूर आहेत. यामागे आदिवासी संस्कृतीमधील गाव व घरांच्या अंतराचा नियम महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत. गडचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा आहे.

गडचिरोली : अनेक वर्षांपासून आदिवासी संस्कृतीला मागास संस्कृती म्हणून हिणवण्यात येत असले, तरी ही संस्कृती मुळीच मागास नसून, या संस्कृतीतील काही नियम आजच्या अत्याधुनिक युगातही उपयोगी आहेत. त्यामुळे जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना गडचिरोली जिल्ह्यात त्याचा प्रभाव फारसा दिसत नाही. सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या तीनशेच्या जवळ पोहोचली असली, तरी यातील बहुतांश बाधित केंद्रीय राखीव व राज्य राखीव पोलिस दलाचे जवान तसेच बाहेरून आलेले नागरिक आहेत. आदिवासींच्या या अनोख्या वैशिष्ट्यामुळेच तेथे कोरोनाचा प्रभाव कमी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कोणतीही पुरातन संस्कृती फायदेशीरच असते, हीच बाब यावरून अधोरेखित असते. काय आहे या संस्कृतीचे वैशिष्ट जाणून घेऊया... 

स्थानिक विशेषत: दुर्गम, अतिदुर्गम भागांतील आदिवासी कोरोनाच्या संसर्गापासून दूर आहेत. यामागे आदिवासी संस्कृतीमधील गाव व घरांच्या अंतराचा नियम महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत. गडचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. येथील दुर्गम भागात फिरताना जी आदिवासी गावे लागतात, तिथे घरांची संख्या अगदीच कमी असते. शिवाय घरे कधीच जवळजवळ बांधली जात नाहीत. गंमत म्हणजे, एकाच गावात काही घरे एका टोकावर तर काही घरे दुसऱ्या टोकावरही बघायला मिळतात. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग सहजच पाळले जाते. 

अधिक माहितीसाठी - कधी प्रश्‍न पडला का? सौभाग्याचे लक्षण असलेल्या बांगड्या महिला का घालतात, हे आहे उत्तर अन्‌ फायदे...
 

पाळीव प्राण्यांसाठी वेगळी व्यवस्था 

 

पूर्वी या जिल्ह्यात विशेषत: भामरागडसारख्या तालुक्‍यात माडिया आदिवासींची कुडाचीच घरे होती. आता काही प्रमाणात सिमेंट कॉंक्रिटची घरे बघायला मिळतात. दुर्गम भागात अगदी चार ते पाच घरांचीही गावे असतात. खरेतर त्या गावाजवळ एखादे मोठे गाव असतानाही ही मंडळी आपल्या छोट्या गावातच राहणे पसंत करतात. कदाचित त्यांच्या या प्राचीन परंपरेनेच त्यांना कोरोनापासून दूर ठेवले आहे, असे म्हणायला वाव आहे. शिवाय त्यांनी पाळीव प्राण्यांसाठीही वेगळी व्यवस्था केलेली असते. 

 

शापच ठरले वरदान...

 

जिल्ह्यातील असंख्य गावे अतिदुर्गम भागात आहेत. या गावांना पोहोचण्यासाठी मातीचे रस्तेसुद्धा नाहीत. मध्ये नदी, नाले असल्यानेही तेथे पोहोचणे कठीण असते. या गावांतील नागरिकांना तालुक्‍याच्या ठिकाणी जाणेसुद्धा शक्‍य होत नाही. ही दुर्गमता एरवी शाप ठरत असली, तरी कोरोनासंदर्भात वरदान ठरली आहे. शिवाय अनेक गावांतील नागरिकांनी मार्च महिन्यातच बाहेरच्या व्यक्तींना गावबंदी केली होती. त्याचाही फायदा झाल्याचे दिसून येते. 

संपादित : अतुल मांगे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona influence in Gadchiroli district is less due to tribal culture