...तो आला अन् सर्व कलावंतांना ब्रेक लावून गेला.... वाचा कसे? 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

कोरोना विषाणूने मार्च महिन्यात देशात हातपाय पसरले. देशात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आल्याने लॉकडाउन जाहीर करण्यात आले. लॉकडाउनमुळे मंच कलावंतांचे सर्व कार्यक्रम बंद आहे.

चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाले. लॉकडाउनमुळे सर्व उद्योगधंदे बंद पडले. कोरोनाचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसला. लग्नसमारंभ, घरगुती कार्यक्रम, सभागृहात गाणे सादर करणाऱ्या कलावंतांना कोरोनाचा मोठा फटका बसला. गेल्या तीन महिन्यांपासून कार्यक्रमांवर बंदी असल्याने कलावंत घरीच बसून आहेत. सध्या या कलावंतांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. 

सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम, घरगुती कार्यक्रम, लग्नसराई कार्यक्रम, सभागृह कार्यक्रमाच्या माध्यमातून कला सादर करणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. या कलावंतांमध्ये निवेदक, गायक, नाट्यकलावंत, पथनाट्य सादर करणारे,ऑर्केस्ट्रॉमधील बॅंड वाजविणारे वाजंत्री, नाट्य अभिनय, नेपथ्यकार यांच्यासह अन्य कलावंतांचा समावेश होतो. विविध कार्यक्रमांत कला सादर करून हे कलावंत स्वतःसह कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. मात्र, कोरोनामुळे त्यांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली आहे. या कलावंतांचा रोजगार पूर्णपणे बंद झाला असून, त्यांचे जगणे कठीण झाले आहे. 

सर्व कार्यक्रम बंद

कोरोना विषाणूने मार्च महिन्यात देशात हातपाय पसरले. देशात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आल्याने लॉकडाउन जाहीर करण्यात आले. लॉकडाउनमुळे मंच कलावंतांचे सर्व कार्यक्रम बंद आहे. कलावंतांना त्यांचा चांगलाच फटका बसला आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. महापुरुषांच्या जयंत्या, गणेश उत्सव, शारदा उत्सव आणि सामाजिक संघटनेच्या वतीने होणाऱ्या कार्यक्रमात आपली कला सादर करून लोकांचे मनोरंजन व समाज प्रबोधन हे कलावंत करतात. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे सर्व कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे या कलाकारांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. 

चंद्रपूर शहरात दोनशेवर कलावंत आहेत. सध्या कार्यक्रम बंद पडल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. अजून वर्षभर तरी कार्यक्रम सुरू होण्याची काही चिन्हे नाही. अशा परिस्थिती शासनाने या कलावंतांना मानधन द्यावे ही अपेक्षा आहे. 

-नीलेश ठाकरे, 
अध्यक्ष, जिल्हा कलाकार असोसिएशन, चंद्रपूर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona locked all artist and Survival problem created