esakal | धक्कादायक! आता लक्षणं नसतानाही आढळत आहेत कोरोनाचे रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

जिल्ह्यातील 70 टक्के रुग्णांमध्ये कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 रोगाची कोणतीच लक्षणं दिसून आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धडधाकट दिसणाऱ्या या रुग्णांच्या स्त्रावांची तपासणी केल्यानंतरच ते कोरोनाची पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. अशा रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सुद्धा लक्षण नसणाऱ्या रुग्णांवर कसा उपचार करावा, असा प्रश्‍न पडला आहे. 

धक्कादायक! आता लक्षणं नसतानाही आढळत आहेत कोरोनाचे रुग्ण

sakal_logo
By
सुगत खाडे

अकोला : जिल्ह्यातील 70 टक्के रुग्णांमध्ये कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 रोगाची कोणतीच लक्षणं दिसून आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धडधाकट दिसणाऱ्या या रुग्णांच्या स्त्रावांची तपासणी केल्यानंतरच ते कोरोनाची पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. अशा रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सुद्धा लक्षण नसणाऱ्या रुग्णांवर कसा उपचार करावा, असा प्रश्‍न पडला आहे. 

करोना विषाणूने जगभर थैमान घातलं आहे. जिल्ह्यातही करोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे जिल्ह्यातील 14 रुग्णांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. त्यासोबतच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 159 वर पोहचली असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

कोरोनाशी सामना करण्यासाठी सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, आयसोलेशन व संस्थागत क्वारंटाईन यासारखे खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. तसेच कोरोनाची लक्षणे आढळल्यास संशयितांची चाचणी केली जात आहे. परंतु जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आढलेल्या 70 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाचे लक्षण न दिसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत आढळलेल्या जवळपास दोन तृतियांश रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. मात्र असे असूनही त्यांची चाचणी ही पॉझिटिव्ह येत आहे. म्हणजेच कोरोना एक सायलंट किलर बनत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

14 दिवसांनंतर सुद्धा लक्षणांचा अभाव
साधारणतः एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास त्या व्यक्तीला ताप किंवा थंडी वाजणे, थरथरणे, स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, खोकला, घसा खवखवणे किंवा श्‍वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे कोरोनाबाधित व्यक्तीमध्ये 14 दिवसांपर्यत या पैकी कोणतेही दोन, तीन लक्षणं आढळू शकतात. त्यानंतर कोरोना संशयित व्यक्तीची चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्यास रुग्णाला कोविड-19 रोगाची लागण झाल्याचे निष्पन्न होते. असे असले तरी जिल्ह्यात आढलेल्या बहुतांश रुग्णांमध्ये 14 दिवसांनंतर सुद्धा कोरोनाचे लक्षणं दिसून आले नाहीत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर नवाच पेच निर्माण झाला आहे. 

हे असू शकते कारण
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे असणे किंवा नसण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जसे एखाद्या रुग्णाच्या शरीरात विषाणूचे प्रमाण, त्याची रोग प्रतिकारशक्ती चांगली असणे, रुग्ण वृद्ध नसणे किंवा रुग्णाला कोणताच आजार नसणे इत्यादी कारणामुळे रुग्णांमध्ये लक्षणांचा अभाव दिसू शकतो. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त चाचणी करणे हाच एकमेव उपाय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

हलगर्जी टाळा, तपासणी करा
अकोला जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यापैकी 60 ते 70 टक्के रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचे लक्षण नसल्याची बाब समोर आली आहे. कंटेंटमेंट झोनमध्ये चाचण्या वाढवल्यानेच रुग्णांची खरी संख्या समोर येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एखाद्या व्यक्तीमध्ये एखाद लक्षण सुद्धा आढळले तरी हलगर्जी न करता शासकीय डॉक्टरांसोबत संपर्क साधावा. 
- डॉ. रियाझ फारुकी
आरोग्य उपसंचालक, अकोला

loading image