कोरोना अहवाल पॉझिटिव्ह हवा की निगेटिव्ह? जिल्हापरिषद सदस्याला चक्क लॅबनं दिली ऑफर 

सुधीर भारती 
Tuesday, 23 February 2021

जिल्हापरिषदेच्या आरोग्य समितीचे सदस्य प्रकाश साबळे यांनी सोमवारी (ता.22) जिल्हापरिषदेच्या आमसभेत हा गौप्यस्फोट केला. शहर तसेच जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून दररोज 800 ते 900 रुग्ण आढळून येत असल्याचे सांगितले.

अमरावती : कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह हवा की निगेटिव्ह, अशी थेट ऑफर एका लॅबकडून खूद्द जिल्हापरिषद सदस्याला देण्यात आली. याबाबत चौकशी केली असता अहवाल देण्यामागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा गौप्यस्फोट त्या सदस्याने केला आहे. यासंदर्भात जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकरी अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या कागदपत्रांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

जिल्हापरिषदेच्या आरोग्य समितीचे सदस्य प्रकाश साबळे यांनी सोमवारी (ता.22) जिल्हापरिषदेच्या आमसभेत हा गौप्यस्फोट केला. शहर तसेच जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून दररोज 800 ते 900 रुग्ण आढळून येत असल्याचे सांगितले. मात्र वास्तविक काही ठराविक बॅंकांकडून दोन ते अडीच लाखांपर्यंतचा कोरोना बिमा काढण्यात येत असून लॅब तसेच काही डॉक्‍टरांना हाताशी घेऊन अहवाल पॉझिटिव्ह तयार करण्यात येत असल्याचा आरोप प्रकाश साबळे यांनी केला. 

हेही वाचा - Sanjay Rathod Live Update : दबाव आणण्यासाठी हे शक्ती प्रदर्शन तर नाही ना?

विशेष म्हणजे एखाद्या व्यक्तीने विमा काढल्यानंतर त्याला लॅबमध्ये चाचणी करायला सांगितली जाते. चाचणीचा अहवाल  पॉझिटिव्ह दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला 14 दिवासांपर्यंत खासगी रुग्णालयात दाखल केले जाते, संबंधित डॉक्‍टरांना त्यांची फीस दिल्यानंतर उरलेली विम्याची रक्कम संबंधित व्यक्तीच्या खात्यावर वळती केली जाते, असा आरोप श्री. साबळे यांनी केला असून आपल्याकडे याबाबतचे सबळ पुरावे असल्याचा दावासुद्धा त्यांनी केला आहे.

जिल्हापरिषदेच्या  सभेत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर अध्यक्ष बबलू देशमुख यांनीदेखील अशाच प्रकारची तक्रार आपल्याकडे आल्याचे सांगितले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी काही प्रकरणांची चौकशी करणार असल्याचे सांगितले. 

...तर लॅबला धडा शिकवू
कोरोना पॉझिटिव्ह अहवाल तयार करून देण्याचे एक मोठे रॅकेट सध्या कार्यरत असून, या माध्यमातून लाखो रुपयांचा व्यवहार केला जात आहे. आपल्याकडे त्याबाबतेच पुरावे असून आपण ते प्रशासनाकडे सोपविणार आहे. अशा लॅबचालकांना आम्ही आता धडा शिकवू.
-प्रकाश साबळे 
जि. प. सदस्य. 

हेही वाचा - मुख्यमंत्री साहेबऽऽ आता साधणार का संवाद? तुमच्याच नेत्याने मोडले कोरोनाचे सर्व नियम

संबंधित सदस्यांकडून सभेमध्ये हा मुद्दा उचलण्यात आला आहे. त्यामधील तथ्य तपासून चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.
-अमोल येडगे 
मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona testing Lab asked man about report in Amravati