कोरोनाने दहिहंडीच्या उत्साह, आनंदावर फेरले पाणी...आता फक्त संसर्गाचीच ‘थर थर'

file photo
file photo

गडचिरोली : "गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला' हे गाणं ओठी आलं की, आठवतो तो कृष्णाष्टमीतील दहीहंडीचा थरार. अंगावर पाण्याचे फव्वारे झेलत, लोकांचे आवाज, आरोळ्या, गोंधळाचा आनंद घेत थरावर थर चढवत मानवी मनोरा रचत दहीहंडी फोडण्याची धमाल. पण, यंदा कोरोनाची काळी छाया कृष्णाष्टमीवरही पडली असून "गोविंदा'च्या मानवी मनोऱ्यांचे थरावर थर चढण्याऐवजी कोरोना संसर्गाच्या भीतीने "थर थर'च उरणार आहे.

बासरीच्या सुरांसोबतच सुदर्शन चक्रासारख्या तीक्ष्ण शस्त्रांच्या धारेवर हुकमत गाजवताना भगवद्‌गीतेच्या माध्यमातून ऐहिक, पारलौकिक जीवनाचे ज्ञान देणारे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या बालपणीच्या कृष्णलीलांसाठीही प्रसिद्ध आहेत. गोकुळातून मथुरेला दूध, दही नेणाऱ्या गोपिकांच्या घागरी फोडणे आणि एखाद्याच्या घरात कुणी नसले की, मित्रांसोबत मानवी मनोरा रचून आढ्याला टांगलेली हंडी फोडून दही, दूध, लोणी चोरणे ही कृष्णाची आवडती कामे होती.

म्हणूनच त्याला प्रेमाने "माखनचोर'ही म्हटले जाते. ही खट्याळ चोरी करणारा कृष्ण हे दही, दूध, लोणी मित्रांमध्ये वाटून द्यायचा. खऱ्या अर्थाने संघटन कौशल्याचीच ही शिकवण होती. त्यामुळे हीच कृष्णलीला पुढे त्याच्या जन्मदिनी दहीहंडीच्या रूपात साजरी होऊ लागली.

अनेक जण आनंदाला मुकणार

कृष्णाष्टमीला एका मातीच्या हंडीत दूध, दही, लोणी घालून ती हंडी उंचावर लटकवली जाते. त्यानंतर कृष्णाचे सहकारी असलेल्या गोविंदाच्या रूपात तरुणांच्या पथकांमध्ये ही हंडी फोडण्यासाठी चढाओढ सुरू होते. हा थरार बघायला लोकांचीही गर्दी जमते. हे मानवी मनोरे रचताना अनेकदा धडपडतात, पडतात पण वाद्यांच्या तालावर नाचत, गात त्यांचे प्रयत्न सुरू असतात. हा थरार सर्वांसाठीच अनोखा अनुभव असतो. पण, यंदा सारेच या आनंदाला मुकणार आहेत.

गोपालकालाही अडचणीत

कृष्णाष्टमीच्या आदल्या दिवशी अनेक गावांमध्ये गोपालकाल्याचे आयोजन केले जाते. रात्रभर भजन, कीर्तनाने वातावरण भक्तीमय करण्यात येते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बाळगोपाळांसह दहीहंडी फोडून हा गोपालकाला वाटला जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे हा गोपालकालाही अडचणीत आला आहे.


श्रीकृष्ण कृपेने हे संकट लवकरच जाईल
दरवर्षी आम्ही कृष्णाष्टमीला दहीहंडीच्या स्पर्धेचे आयोजन करत होतो. पण, कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा सोहळा स्थगित करावा लागला. श्रीकृष्ण कृपेने हे संकट लवकरच जाईल आणि पुढल्या वर्षी हा सोहळा अधिक भव्य स्वरूपात आम्ही आयोजित करू.
- अनिल तिडके, अध्यक्ष, श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती, गडचिरोली.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com