esakal | खवय्यांच्या ताटातून कोंबडी पळाली; तंगडी काही मिळेना!
sakal

बोलून बातमी शोधा

Chicken masala

चिकनमुळे कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते, अशी चुकीची माहिती सोशल मीडियातून पसरली आणि व्हायरसच्या भीतीने मांसाहारींनी अचानक चिकन खायचे बंद केले.

खवय्यांच्या ताटातून कोंबडी पळाली; तंगडी काही मिळेना!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर विषाणूंपेक्षा अधिक वेगाने पसरलेल्या अफवांचा फटका चिकन बाजाराला बसला आहे. कोंबड्यांच्या माध्यमातून कोरोना व्हायरसची लागण होण्याची भीती पसरल्यामुळे राज्यभरासह अमरावती जिल्ह्यातही अनेकांनी चिकनला "बायबाय' केले आहे.

जिल्ह्यातल्या 60 टक्के मांसाहारप्रेमींनी चिकन खाणे बंद केल्यामुळे दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या पोल्ट्रीफार्मसह चिकन बाजाराला कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. तरी राज्य शासनाने पोल्ट्री व्यावसायिकांकडे लक्ष देऊन प्रती पक्षी 165 रुपयांची मदत करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. 

कोरोनोच्या भीतीने चिकन खाणे बंद

चिकनमुळे कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते, अशी चुकीची माहिती सोशल मीडियातून पसरली आणि व्हायरसच्या भीतीने मांसाहारींनी अचानक चिकन खायचे बंद केले. अमरावती जिल्ह्यात सध्या 16 लाख बॉयलर कोंबड्या व प्रतिदिन 10 लाख अंडी उत्पादन सुरू असून त्याचा खप सध्या निम्मा झाला आहे. यामुळे पोल्ट्रीफार्मधारक मोठ्या अडचणीत सापडले असून व्यवसायला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. अमरावती शहरातल्या हॉटेल व्यावसायिकांची दररोज 10 ते 12 टन चिकनची मागणी व्हायची. मात्र, सध्या हेच प्रमाण 60 टक्‍क्‍यांनी घसरले आहे. चिकनची मागणी घटल्याने चिकन विक्रेते तर अडचणीत आले आहेतच, मात्र पोल्ट्री फार्म चालवणाऱ्या शेतकरी आणि व्यावसायिकांवरही संकट ओढवले आहे. एका 3 किलो वजनाच्या कोंबडीला 210 रुपये खर्च येतो. पण सध्या भाव नसल्यामुळे ती 15 रुपये किलोप्रमाणे 45 रुपयांना विकली जात आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे 165 रुपये प्रती पक्षी सध्या नुकसान होत आहे तर अंड्यांना सुद्धा सध्या केवळ 2 रुपये 70 पैसे प्रती नग दराने विकावे लागत आहे. 

अवश्य पहा-  video : शाळा पाडायला आला जेसीबी, विद्यार्थी झाले संतप्त 

कोंबडी अथवा प्राण्यात कोरोना व्हायरस नाही

कोंबडीची छोटी पिल्लं पूर्वी 20 ते 25 रुपये दराने विकली जायची. आता ती दहा ते बारा रुपयांवर आली आहेत. त्यामुळे पोल्ट्रीफार्म मालक अडचणीत आले आहेत. आपल्याकडे चिकन ज्या पद्धतीने शिजवले जाते, त्यानुसार त्यात कोणतेही विषाणू जिवंत राहण्याची शक्‍यताच नाही. याशिवाय कोंबडी किंवा कोणत्याही प्राण्याच्या शरीरात कोरोना व्हायरस असल्याची भारतात चिन्हे नाहीत. त्यामुळे चिकन खाणाऱ्यांनी मनामध्ये अजिबात शंका बाळगू नये, असे आवाहन अमरावती जिल्हा पोल्ट्री असोशिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. शेतीला जोडधंदा म्हणून अनेकांनी पोल्ट्रीफार्म सुरू केले आहे. मात्र, कोरोना व्हायरसच्या भीतीने हा जोडधंदा उद्‌ध्वस्त होण्याकडे वाटचाल करीत आहे. ही अवस्था एकट्या अमरावती जिल्ह्याची नाही तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हा अफवेचा व्हायरस झपाट्याने पसरत आहे. मांसाहारींनी अशा अफवांना बळी न पडता चिकन खात राहावे, असे आवाहन केले जात आहे. 
 

loading image
go to top