गौरवास्पद! सहाय्यक फौजदार कुटुंबासह कोरोनाच्या लढ्यात; असे देताय सेवा...वाचा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

खामगाव नजीक वाडी येथील रहिवासी सहाय्यक फौजदार श्याम पाटील हे शेगाव पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. सध्या कोरोनाचा फैलाव आणि समूह संसर्ग रोखण्यासाठी पोलिस प्रशासन दिवस-रात्र काम करीत आहेत.

खामगाव (जि.बुलडाणा) : येथील सहाय्यक फौजदार श्याम पाटील त्यांची मुलगी डॉ. दीपाली पाटील व मुलगा अनिरुद्ध हे तिघेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत आहेत. पाटील कुटुंब एक प्रकारे कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी झाले असल्याचे दिसून येत आहे. 

खामगाव नजीक वाडी येथील रहिवासी सहाय्यक फौजदार श्याम पाटील हे शेगाव पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. सध्या कोरोनाचा फैलाव आणि समूह संसर्ग रोखण्यासाठी पोलिस प्रशासन दिवस-रात्र काम करीत आहेत. रस्त्यावर येऊन जीव धोक्यात घालत पोलिस बांधव आपले कर्तव्य बजावत आहेत. पोलिस दलात श्याम पाटील हे सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मीच माझा रक्षक’ ही मोहीम हाती घेतलेली आहे. 

आवश्यक वाचा - अकोला पोलिसांनी गुंडासाठी राबविला 'मुळशी पॅटर्न'

जिल्हा पोलिस अधीक्षक हे स्वतः प्रत्येक पोलिस स्टेशनला जाऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाशी लढण्याबाबत करावयाच्या उपाययोजनांची माहिती देतात. सर्वच पोलिस बांधव बुलडाणा जिल्ह्यात कोरोना विरोधात लढा देत आहेत. त्यात श्याम पाटील हे सुद्धा आपल्याला दिलेली जबाबदारी पार पाडत आहेत. ते शेगाव येथे गजानन महाराज मंदिर परिसरात ड्युटी देत आहेत. त्यांची मुलगी डॉ. दीपाली पाटील ही एमडी मेडिसीन असून, मुंबई येथे नायर हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या टीममध्ये सहभागी आहे. 

कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी डॉ. जीवाचे रान करत आहेत. कोरोनाच्या लढ्यात डॉ. दीपाली सुद्धा आपले योगदान देत असून, तिच्या कार्याची शहर व परिसरात प्रशंसा होत आहे. त्याचप्रमाणे पाटील यांचा मुलगा अनिरुद्ध पाटील हे सुद्धा खामगाव नगरपालिकेने स्थापन केलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकात वाहन सेवा देत आहेत. त्यामुळे पाटील कुटुंबिय कोरोनाच्या लढ्यात सहभागी असल्याचे दिसून येत आहे.

सेवा हेच समाधान!
पती, मुलगा, मुलगी संपूर्ण कुटुंब कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवा कार्यात स्वतःला झोकून काम करत आहे. सर्वांची काळजी वाटते मात्र, आपल्या घरातील सदस्य संकटकाळात सेवा देत असल्याचे समाधान असल्याचे श्‍याम पाटील यांच्या पत्नी सरला पाटील यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Corona's fight with the assistant police officer family