esakal | विदर्भासाठी गुड न्यूज; अमरावती जिल्हा कोरोनामुक्त; दीड वर्षानंतर रुग्णसंख्या शून्य
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

विदर्भासाठी गुड न्यूज; अमरावती जिल्हा कोरोनामुक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून प्रसिद्ध झालेला अमरावती जिल्हा कोरोनामुक्त झाल्याची दिलासादायक माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे. रविवारी (ता. ५) अमरावती जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. विविध प्रयोगशाळांमधून एकाही रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही. तब्बल दीड वर्षानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्या शून्य आल्याने जिल्हावासीयांना प्रामुख्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून अमरावती जिल्ह्याची रुग्णसंख्या सातत्याने वाढतच होती. मार्च, एप्रिलमध्ये दुसरी लाट असताना तर कोरोनाने कहरच केला होता. केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात अमरावती जिल्ह्याचे नाव हॉटस्पॉट म्हणून घेतले जात होते. एवढेच काय तर अमरावती जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक पाहता केंद्रीय आरोग्य विभागाच्या टास्क फोर्सने सुपर स्पेशलिटीमध्ये बैठक घेऊन चिंता व्यक्त केली होती. विशेष म्हणजे प्रत्येक दिवशी एक हजारांवर रुग्ण आणि १० ते १२ मृत्यू असे जणू समीकरणच बनले होते.

हेही वाचा: पीक विमा योजना शासनाने चालवावी; केंद्र व राज्य सरकारकडे मागणी

कोरोनाच्या या उद्रेकासमोर आरोग्य यंत्रणा सुद्धा हतबल झाल्याचे दिसून येत होते. शासकीय तसेच खासगी कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडसची कमतरता सुद्धा जिल्ह्याने पाहिली आहे. मात्र, हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत गेली, अन्य काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या निरंक झाली असली तरी अमरावती जिल्ह्यात मात्र अखेरपर्यंत १० ते १२ च्या घरात रुग्णसंख्या कायम राहिली. मात्र, रविवारी दीड वर्षाचा विक्रम मोडला गेला आणि कोरोनामुक्त जिल्ह्यामध्ये अमरावतीचा समावेश झाला. ही बाब अमरावतीकरांसाठी दिलासादायक आहे.

ते चित्र अंगावर शहारे आणणारे

मन खिन्न करून टाकणारे स्मशानभूमीतील दृष्य अमरावतीकर कधीही विसरू शकणार नाहीत. एकेका दिवशी १० ते १५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. त्यासाठी सुद्धा स्मशानभूमीतील गॅसवाहिनीवर वेटिंग लिस्ट होती. अंगावर शहारे आणणारे ते दिवस अमरावतीकरांच्या स्मृतीत कायम राहणार आहेत.

...तर सावध रहा

पुन्हा असे भयावह चित्र समोर येणार नाही याची दक्षता आता नागरिकांनीच घेतली पाहिजे. कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला असला तरी तो संपलेला नाही. सणासुदीच्या या दिवसांमध्ये मिळालेल्या सुटीचा गैरफायदा न घेता आपल्यासोबतच समाजाच्या आरोग्य जपण्यासाठी कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहे.

हेही वाचा: अमरावती : मेळघाटातील पशुधन वाऱ्यावर; १३ जागा रिक्त

आठवडाभरातील रुग्णांची आकडेवारी

30 ऑगस्ट : 02

31 ऑगस्ट : 03

1 सप्टेंबर : 03

2 सप्टेंबर : 09

3 सप्टेंबर : 02

4 सप्टेंबर : 02

5 सप्टेंबर : 00

loading image
go to top